स्वच्छतेसाठी झटले ६०० कामगार

By admin | Published: September 26, 2015 11:08 PM2015-09-26T23:08:59+5:302015-09-26T23:10:00+5:30

क्लीन त्र्यंबक : वेतन अदा करण्यात मात्र अडथळे

600 workers to clean up | स्वच्छतेसाठी झटले ६०० कामगार

स्वच्छतेसाठी झटले ६०० कामगार

Next

नाशिक : कुठे कागदाचा कपटा पडला, प्लॅस्टिकच्या पिशव्या पडलेल्या दिसल्या अथवा कुठे अन्नछत्रातून उष्टेखरकटे बाहेर उघड्यावर टाकून दिले तर लगेच परिसर स्वच्छतेसाठी पुढे येणारे कामगार, असे सुखावणारे चित्र त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीत भाविकांना पाहायला मिळाले. ‘क्लीन त्र्यंबक’ या संकल्पनेला हातभार लावणाऱ्या या कामगारांमधील अनेकांना मात्र गेल्या तांत्रिक मुद्यांमुळे वंचित राहावे लागले आहे.
नाशिक महापालिकेप्रमाणेच त्र्यंबक नगरपालिकेनेही तीनही पर्वणीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेचे कंत्राट दिले होते. नांदेडच्या ठेकेदाराने सदर ठेका घेतला आणि ८०० कामगारांपैकी सुमारे ३५० कामगार हिंगोली, परभणी या भागातून आणले. उर्वरित कामगार हे त्र्यंबकेश्वर परिसरातील आसपासच्या खेड्यापाड्यांतील मोलमजुरी करणारे ग्रामस्थ होते. त्यामुळे निम्म्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला. नाशिक महापालिकेच्याच धर्तीवर त्र्यंबकेश्वर याठिकाणीही कठोर नियमावली अंमलात आणण्यात आली. ठेकेदाराकडून रोज प्रत्येक सत्रातील कामगारांच्या हजेरीचा लेखाजोखा अ‍ॅपमार्फत घेण्यात येत होता. याशिवाय कामगारांची बायोमेट्रिक हजेरी अ‍ॅपमार्फतच घेतली जात होती. सदर कामगारांना ३०० रुपये प्रति दिन रोज निश्चित करण्यात आला होता, असे कामगारांकडूनच सांगण्यात आले. १३ जुलै ते २६ सप्टेंबरपर्यंत सदर कामाचा ठेका देण्यात आला. परंतु, अनेक कामगारांनी सुरुवातीला केवळ हजार रुपये अ‍ॅडव्हान्स मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर वेतन बॅँकेत जमाच झाले नसल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान, या सफाई कामगारांनी तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीला आपली भूमिका चोख बजावली. शाही मिरवणूक मार्ग, साधुग्राम परिसर, कुशावर्त परिसर याठिकाणी सफाई कामगार तैनात ठेवण्यात आले होते. मिरवणूक मार्गावरून एका आखाड्याची मिरवणूक गेल्यानंतर लगेचच दुसरा आखाडा येण्यापूर्वी कामगार रस्ते साफ करत होते. कचऱ्याचे ढीग तातडीने व्हीलबरोजच्या साहाय्याने हलविले जात होते. मिरवणूक मार्गही पाण्याने स्वच्छ केला जात होता. कुशावर्त परिसर पाण्याने दोन वेळा स्वच्छ करण्यात आला. याशिवाय प्रमुख दहाही आखाड्यांमध्ये प्रत्येकी दहा सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. स्वच्छतेच्याबाबत नगरपालिकेकडे फारशा तक्रारी आल्या नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: 600 workers to clean up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.