शहरातून ६१६ श्रमिक विशेष रेल्वेने बिहारला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 09:42 PM2020-05-31T21:42:10+5:302020-05-31T21:42:29+5:30
रविवारी (दि ३१)दुपारी ४ वाजता विशेष रेल्वेने ६१६ व्यक्तींना बिहार मध्ये पाठवण्यात आले.रेल्वे स्थानकावर या नागरिकांना नेण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती.
नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने बिहारच्या विविध भागातील राहणाऱया ६१६ श्रमिकांना रविवारी (दि 31) दुपारी विशेष श्रमिक रेल्वेने त्यांच्या मूळ गावी विशेष रेल्वेने पाठवण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या अशा प्रकारे एकूण १० हजार ८६९ परराज्यातील नागरिकांना रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले.
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली होती. रविवारी (दि ३१)दुपारी ४ वाजता विशेष रेल्वेने ६१६ व्यक्तींना बिहार मध्ये पाठवण्यात आले.रेल्वे स्थानकावर या नागरिकांना नेण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी या सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.तसेच यासर्व प्रवाश्यांचे रेल्वे तिकीट बुकिंग प्रशासनामार्फत करण्यात आले.तसेच रेल्वे स्थानकात व रेल्वे प्रवासात फिजिकल डिस्टन्स राहील या बाबत दक्षता घेण्यात आली. या सर्व नागरिकांना पाठवण्यापूर्वी मनपाचे वैद्यकीय पथकाने त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले. तसेच त्यांना प्रवासात दोन दिवस पुरेल एवढे पाणी बॉटल, सुके खाद्यपदार्थ, दशम्या सोबत देण्याची व्यवस्था उपायुक्त अर्चना तांबे यांनी याबाबत नियोजन केले व मनपा शिक्षण समितीचे अधिकारी ,कर्मचारी यांची यावेळी उपस्थित होते.
नाशिक शहरातून मध्य प्रदेश, छत्तीसगड ,हिमाचल प्रदेश,तमिळनाडू ,मिझोराम, उत्तर प्रदेश, बिहार या सारख्या विविध राज्यांमध्ये १० हजार ८६९ इतक्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी रेल्वेद्वारे पाठवण्याची व्यवस्था नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती. या सर्व नागरिकांना कुठलीही अडचण होणार नाही याबाबत मनपाच्या वतीने विशेष दखल घेण्यात आली होती.