६२ टक्के बसेस अद्यापही आगारातच; ग्रामीण भागाला पिकअपचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:16+5:302021-06-28T04:11:16+5:30
नाशिक : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाला शंभर टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली ...
नाशिक : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाला शंभर टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी जिल्ह्यातील बसेस अजूनही पूर्णपणे सुरू होऊ शकलेल्या नाहीत. प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याचे कारण आहेच, शिवाय खर्च कमी करण्याचा प्रयत्न म्हणूनदेखील अनेक बसेस आगारातच उभ्या करण्यात आलेल्या आहेत.
यावर्षी बसेस रुळावर येत असतानाच लॉकडाऊन लागू करण्यात आला, त्यामुळे अत्यावश्यक सेवावगळता इतर प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण एप्रिल-मे महिन्यात महामंडळाच्या बसेस उभ्या होत्या. जून महिन्यात निर्बंध कमी झाल्याने शंभर टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली; मात्र कोरोनामुळे बसेसमधून प्रवास करण्याबाबत नागरिकांमध्ये काहीशी साशंकता असल्याने बसेसला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. ग्रामीण भागातून अजूनही पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे.
--इन्फो--
या गावांना बस कधी सुरू होणार?
१) ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याने या प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
२) बागलाण, सुरगाणा, हरसूल, सय्यदपिंप्री, सायखेडा या गावांकडील बसेस बंद आहेत.
३) तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या सध्या मागणीनुसार सोडल्या जात आहेत.
४) नाशिक-१ आगारातून जिल्ह्याच्या बसेस बंद असून, बाहेरगावच्या बसेस चालविल्या जात आहेत.
--इन्फो--
एकूण बसेस : ६६०
सध्या सुरू असलेल्या बसेस : ४६०
आगारात उभ्या बसेस : २००
एकूण कर्मचारी : ४५००
चालक : २१००
वाहक : १९००
सध्या कामावर चालक : ९२०
सध्या कामावर वाहक ९२०
--इन्फो--
प्रवाशांचा खासगी गाड्यांचा आधार
१) ग्रामीण भागात प्रवासी बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. गंगापूर-गिरणारे, हरसूल या मार्गावर बसेस नसल्याने प्रवाशांना पिकअप जीप तसेच रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.
२) ओझर, त्र्यंबकेश्वर, सिन्नर यामार्गावरदेखील पिकअप जीप भरून प्रवासी वाहतूक केली जात आहे. भगूरला जाणाऱ्यांना रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.
३) वणी, दिंडोरी, पेठ मार्गावरील बसेस कमी असल्याने प्रवाशांना जीपने प्रवास करावा लागत आहे.
--कोट--
काय म्हणतात प्रवास करणारे
ग्रामीण भागातील बसेस अजूनही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. कधी कोणती बस सुरू होते आणि बंद केली जाते हेच कळत नसल्याने बसची वाट न पाहाता मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. हरसूल ते नाशिक जीपने प्रवास करावा लागला. परतीसाठी तीच जीप असेल तर नाशिकला यावे लागते. बस नसल्याने जीपवरच अवलंबून आहे.
- बापू मोडवे, प्रवासी
त्र्यंबकेश्वरला जायचे तरी बसची वाट पहावी लागते. दर तासाला बस असल्याचे कंट्रोलकडून सांगण्यात आले; मात्र दोन तास झाले बसच उभी नाही.
बस सोडली जाणार आहे की नाही याविषयी कुणालाही माहिती नाही. या मार्गावर खासगी वाहने कमी असल्याने प्रवास करणे कठीण होते. जिल्ह्यात कोठेही जायचे असले तरी परतीला बस मिळेलच हे सांगता येत नाही.
- अर्जुन खताळ, प्रवासी