तेरा लाखांच्या मुद्देमालासह ६४ किलो ओला गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:32 AM2019-01-20T00:32:31+5:302019-01-20T00:33:42+5:30
रेस्ट कॅम्प रोडवर आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास नाशिक पोलीस युनिट वनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका वाहनातून तेरा लाखांच्या मुद्देमालासह ६४ किलो ओला गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
देवळाली कॅम्प : येथील रेस्ट कॅम्प रोडवर आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास नाशिक पोलीस युनिट वनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एका वाहनातून तेरा लाखांच्या मुद्देमालासह ६४ किलो ओला गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत देवळाली कॅम्पला गांजा वाहतूक करणारे वाहन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार युनिट वनचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, उपनिरीक्षक बलराम पालकर यांनी रेस्ट कॅम्प रोडवर वाहनांची तपासणी सुरू केली. एक दीड वाजेच्या दरम्यान, भेटलेल्या माहितीनुसार इनोव्हा गाडी (एमएच ०६, एबी ८७८१) दिसताच चालकाला थांबण्याबाबत इशारा करण्यात आला. पोलीस कर्मचारी धाव घेऊन गाडीतून उतरून पळणाºया संशयितास ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयित आरोपी मंगेश भगत (रा. सिन्नर फाटा) राहुल भुजबळ (रा. मेरी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दहा हजार रु पये किमतीचे तीन भ्रमणध्वनी व आठ लाखांची एक इनोव्हा कार असा १३ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.