जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान
By admin | Published: October 15, 2014 11:24 PM2014-10-15T23:24:20+5:302014-10-16T01:19:28+5:30
जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान
नाशिक : मतदान यंत्रात अचानक झालेल्या बिघाडामुळे काही काळ झालेला खोळंबा, यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारींमुळे माघारी फिरलेले मतदार व प्रतिस्पर्ध्यांकडून पैसे वाटप होत असल्याच्या सार्वत्रिक तक्रारींमुळे काही ठिकाणी झालेली बाचाबाची वगळता जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ७३ टक्के मतदान दिंडोरी मतदारसंघात झाले असून, सर्वात कमी मतदान नाशिक पूर्व मतदारसंघात ५२ टक्के इतके झाले. दरम्यान, शहरातील गंगापूररोडवरील एका मतदान केंद्रात मतदान करून परतणारी महिला व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांच्यात वाद होऊन झालेली फ्रीस्टाईल पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली.
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६० टक्के इतके विक्रमी मतदान नोंदविले गेले होते, तर गेल्या विधानसभा निवडणुकीची टक्केवारी ५८ इतकी होती. यंदा मात्र ही टक्केवारी कमालीची वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या टक्केवारीने देशातील सत्तापरिवर्तनाचा इतिहास पाहता, विधानसभेतही वाढलेली टक्केवारी व सर्वपक्षीयांची स्वबळाची आजमावणी पाहता, वाढलेला टक्का विद्यमान सत्ताधाऱ्यांना हादरा देतो की हात, याविषयी अंदाज बांधले जात आहेत.
या मतदानाने जिल्ह्यातील १७३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतयंत्रांत बंद झाल्याने आता त्याचा फैसला रविवार (दि. १९) होणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळच्या दोन तासांत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. नऊ वाजेनंतर शहरी मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडला. कडक उन्हाचा चटका बसत असतानाही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली; मात्र लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांमधील उत्साह काहीसा कमी दिसून आला. शहरी भागातील झोपडपट्ट्यांमधील मतदार अपेक्षेने चार वाजेपर्यंत बसून राहिले. शेवटच्या तासात मात्र त्यांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याने मतदानाची वेळ संपुष्टात आल्यावर सहा वाजेनंतरही काही ठरावीक ठिकाणी रांगा कायम राहिल्या.
पहिल्यांदाच सर्व पक्ष स्वबळावर ताकद आजमावत असल्यामुळे या निवडणुकीत सर्वपक्षीय प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय, अखेरच्या क्षणापर्यंतही मतदारांच्या मनाचा ठाव न लागू देणाऱ्या या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ४२०८ केंद्रांवर मतदान घेण्यात आले.
सकाळी ६ वाजताच मतदान कर्मचाऱ्यांनी तयारी पूर्ण करून साडेसहा वाजेपर्यंत मतदानाची रंगीत तालीम (मॉकपोल) केले. यादरम्यान काही ठिकाणी मतदान यंत्र सुरू होत नसल्याचे लक्षात येताच ७ वाजेपूर्वी ते बदलून घेण्यात आले, तर काही ठिकाणी मतदानप्रक्रिया सुरू झाल्यावर यंत्र नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अर्धा ते पाऊण तासापर्यंत मतदानप्रक्रिया बंद पडली. परिणामी सकाळी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडलेल्या मतदारांच्या रांगा लागल्या. त्यातही वयोवृद्ध मतदारांनी मात्र उशीर होत असल्याचे कारण देत माघारी फिरणे पसंत केले.