३० टक्के नाशिककरांच्या घरात पोहोचणार ‘मुकणे’चे पाणी प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण : गंगापूर, दारणा धरणांवर पडणारा ताण कमी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:20 AM2018-01-01T01:20:47+5:302018-01-01T01:21:39+5:30
नाशिक : नाशिककरांना गंगापूर आणि दारणा धरणांतून पाणीपुरवठा होत असतो. मात्र, सन २०१८ मध्ये नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३० टक्के नाशिककरांच्या घरात मुकणे धरणातील पाणी पोहोचणार आहे.
नाशिक : नाशिककरांना गंगापूर आणि दारणा धरणांतून पाणीपुरवठा होत असतो. मात्र, सन २०१८ मध्ये नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३० टक्के नाशिककरांच्या घरात मुकणे धरणातील पाणी पोहोचणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानाच्या माध्यमातून २६६ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारणीची मुदत जुलै २०१८पर्यंत आहे. आतापर्यंत मुकणे धरणातून थेट पाइपलाइन टाकण्याचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
नाशिक शहरातील वाढत्या लोकसंख्येला भविष्यात जीवनदायी ठरणाºया मुकणे धरणातून थेट पाइपलाइन टाकण्याच्या कामाला फेब्रुवारी २०१६ मध्ये प्रारंभ झाला. मुकणे धरणात ४०० दशलक्षलिटर्स प्रतिदिन क्षमतेचे हेडवर्क्स बांधणे, मुकणे धरण ते विल्होळी नाक्यापर्यंत १८०० मि.मी. व्यासाची सुमारे १६ कि.मी. लांबीची उर्ध्ववाहिनी टाकणे, पाथर्डी ट्रक टर्मिनस येथे १३७ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधणे आदी कामे या प्रकल्पात प्रस्तावित आहेत. चेन्नईच्या मे. एल अॅण्ड टी कंपनीने सदर काम हाती घेतले आहे.
प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी केंद्र शासनाकडून ५० टक्के, राज्य शासनाकडून २० टक्के याप्रमाणे एकूण ७० टक्के अनुदान मिळणार आहे, तर नाशिक महापालिकेचा ३० टक्के हिस्सा आहे. त्यानुसार, आतापर्यंत केंद्र सरकारकडून ११०.२० कोटींपैकी ९९.१८ कोटी, राज्य शासनाकडून ४४.०७ कोटींपैकी ३९.६७ कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झालेले आहेत. महापालिकेला प्राप्त १३८.८५ कोटी रुपयांपैकी आतापर्यंत या प्रकल्पावर १०४.८६ कोटी रुपये खर्च झालेले आहेत. सदर कंपनीला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३० महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे आणि ती जुलै २०१८ मध्ये संपणार ्रआहे. प्रकल्पाच्या कामाची एकूणच गती पाहता डिसेंबर २०१८अखेर प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना गंगापूर, दारणा धरणापाठोपाठ आता मुकणे धरणातूनही पाणी उपलब्ध होणार आहे. मुकणे धरणातून महापालिकेला प्रतिदिन सुमारे ४०० दशलक्ष लिटर्स पाणी उचलता येणार आहे. नाशिकची वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात मुकणेचे पाणी नाशिककरांना जीवनदायी ठरणार आहे.
पाणीसाठ्यामुळे कामात खोळंबा
मुकणे धरणातील हेडवर्कचे काम एप्रिल २०१६ मध्ये सुरू झाले. धरणाच्या जलाशयात कॉफर डॅम उभारून जॅकवेलचे काम १० जुलै २०१६ पर्यंत सुरू होते. परंतु जुलै २०१६ मध्ये व नंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाल्याने हेडवर्क्सची कामे थांबवावी लागली. २०१७ मध्येही हीच स्थिती निर्माण झाली. त्यामुळे धरण जलाशयातील हेडवर्क्सच्या कामांना वर्षभरात साधारणत: फक्त चार महिन्यांचाच कालावधी मिळत आहे. यावर्षी सष्टेंबर महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पातळीत मोठी वाढ होऊन धरण ९५ टक्के पेक्षा जास्त भरले आहे. सदर धरण गेल्या १५ वर्षांत प्रथमच इतके भरले आहे. यापूर्वी धरण सर्वसाधारणपणे ६०ते ६५ टक्के भरत होते. त्यामुळे २०१८ मध्ये धरणाच्या जलाशयातील कामे थोडे उशिराने सुरू होतील. मुदतीत प्रकल्प साकार होणार नसला तरी डिसेंबरअखेरपर्यंत नाशिककरांच्या घरात मुकणेचे पाणी पोहोचण्याचा दावा महापालिका करत आहे.