अडीच महिन्यांत अवघे 6500 स्मार्ट लाइट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 01:15 AM2019-10-31T01:15:29+5:302019-10-31T01:15:44+5:30

शहरात ९२ हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला असला तरी अडीच महिन्यांत अवघे साडेसहा हजारच दिवे बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 6500 smart lights in just over two and a half months | अडीच महिन्यांत अवघे 6500 स्मार्ट लाइट्स

अडीच महिन्यांत अवघे 6500 स्मार्ट लाइट्स

googlenewsNext

नाशिक : शहरात ९२ हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला असला तरी अडीच महिन्यांत अवघे साडेसहा हजारच दिवे बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उर्वरित साडेनऊ महिन्यांत याच गतीने काम कसे काय होऊ शकेल, असा प्रश्न निर्माण झाला असून, यासंदर्भात स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी माहिती मागवली आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात ९२ हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. संबंधित कंपनीचे काम दिल्यानंतर अडीच महिने झाले तरी साडेसहा हजार दिवेच बसविण्यात आले आहेत. नगरसेवकांना अत्यंत गतीने काम करण्याची अपेक्षा होती. मात्र त्यानंतरदेखील काम संथगतीने सुरू आहे. दिवे बदलण्यासाठी कंपनीनेच ८० कर्मचारी नियुक्त केले असून, सहा विशेष वाहने दिली आहेत. मात्र, त्यातील वाहन बंद आहेत. एक पथदीप बदलण्यासाठी किमान दोन कर्मचारी लागतात. म्हणजे अवघे चाळीस कर्मचारीच महापालिकेकडे असून त्यांनी अगदी पूर्ण क्षमतेने काम केले तरी अडीचशे दिवेच लागू शकतात. ठेकेदार कंपनीचा उर्वरित कालावधी तपासला तर साडेनऊ महिन्यांत सुमारे ८६ हजार दिवे कसे लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असाच वेग राहिला तर वेळेत दिवे लागूच शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यातच कंपनीने मध्यंतरी फिटिंग्ज संपल्याचे निमित्त पुढे केले होते. त्यामुळे वेळेत काम होण्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे दिवे बदलण्याचे काम एकाच वेळी संपूर्ण प्रभागात न करता एक-दोन लेनमध्ये दिवे बदलण्याचे काम करून नंतर दुसरा भाग शोधला जातो. परिणामी एका भागात तरी पूर्ण दिवे बदलले जात नसल्याने काही ठिकाणी एलईडी तर काही ठिकाणी सोडियम वेपरचे दिवे असा अजब प्रकार होत आहे.
एलईडी दिवे बसवण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. हे काम वेळेत करण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीने कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे आहे. महापालिकेने कंपनीला सूचना करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
- उद्धव निमसे, सभापती,
स्थायी समिती
एका भागात काही दिवे एलईडीचे तर काही सोडियम वेपरचे असा अजब प्रकार सुरू आहे. वास्तविक एका संपूर्ण प्रभागात दिवे बसवून मगच दुसऱ्या प्रभागात काम केले पाहिजे.
- प्रथमेश गिते, उपमहापौर

Web Title:  6500 smart lights in just over two and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.