जिल्ह्यात दिवसभरात ६५०८ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 01:12 AM2021-04-09T01:12:10+5:302021-04-09T01:13:21+5:30
जिल्ह्यात गुरुवारी (दि.७) कोरोना बाधित संख्येने ६५०८ हा नवीन उच्चांक तर मृतांच्या संख्येतही तब्बल ३४ पर्यंत वाढ झाली आहे. एकाच दिवसातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक ३४ बळीमुळे आतापर्यंतच्या बळींची संख्या २५८७ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि.७) कोरोना बाधित संख्येने ६५०८ हा नवीन उच्चांक तर मृतांच्या संख्येतही तब्बल ३४ पर्यंत वाढ झाली आहे. एकाच दिवसातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक ३४ बळीमुळे आतापर्यंतच्या बळींची संख्या २५८७ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येने ऑक्सिजन ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर औषधे अशा सर्वच स्तरांवर यंत्रणादेखील अपुरी पडू लागली आहे. कोरोनाचे थैमान सुरूच असून त्यात सतत वाढ होऊ लागल्याने नाशिककरांच्या चिंतेला अंत उरलेला नाही.
गुरुवारी पुन्हा सहा हजारांहून अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३२८९, नाशिक ग्रामीणमध्ये २९४१, मालेगाव मनपा क्षेत्रात १२५ तर जिल्हा बाह्य क्षेत्रामध्ये १५३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उपचाराथी रुग्णांची संख्या तब्बल ३५८५१ वर पोहोचली आहे.
ग्रामीणमध्ये वाढते बळी
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावानंतर शहरातील मृत्युचे प्रमाण अधिक होते. मात्र मार्च अखेरपासून ग्रामीणमधील बाधितांचे मृत्यू अधिक असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून तब्बल तीन दिवस ग्रामीण मधील मृत्यू शहरापेक्षा अधिक झाल्याने ग्रामीण भागावर देखील आता अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
३०३३ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील खूप खाली आले असून बुधवारी हे प्रमाण ८२.३९ टक्क्यांवर आले आहे. दरम्यान जिल्ह्यात ३०३३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. शनिवारी बळी गेलेल्या नागरिकांपैकी ११ नागरिक नाशिक मनपा क्षेत्रातील, १९ नाशिक ग्रामीणमधील आणि मालेगाव मनपातील २ तर जिल्हा बाह्य २ रुग्ण आहेत. त्यामुळे यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.