राज्यात सर्वाधिक ६६ बिबटे नाशकात गतप्राण!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 03:35 PM2021-12-21T15:35:22+5:302021-12-21T15:38:40+5:30
वन्यजीव कायद्याच्या अनुसूची-१मध्ये समाविष्ट असलेल्या बिबट्या या वन्यप्राण्याला कायद्याचे संरक्षण लाभलेले असले तरी बिबट्या संवर्धनासाठी वनविभागाचे प्रयत्न राज्यात अपुरे ...
वन्यजीव कायद्याच्या अनुसूची-१मध्ये समाविष्ट असलेल्या बिबट्या या वन्यप्राण्याला कायद्याचे संरक्षण लाभलेले असले तरी बिबट्या संवर्धनासाठी वनविभागाचे प्रयत्न राज्यात अपुरे पडताना दिसून येतात. उघड्या विहिरी बंद करण्याबाबत कुठल्याही स्तरावर वनविभागाकडून प्रयत्न होत नसल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर सातत्याने बिबटे भरधाव वाहनांखाली चिरडले जातात, मात्र वनविभागाला अद्याप बिबटे प्रवण क्षेत्रांमध्ये महामार्गांवर वन्यप्राणी ‘फुटप्रिंट’चे ठसे रंगविण्यासाठीही मुहूर्त मिळालेला नाही. रस्त्यांच्या कडेला केवळ फलक लावून औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. हे फलकदेखील महामार्गांवर मोजक्याच ठिकाणी नजरेस पडतात. काही फलकांची तर दुर्दशा झालेली आहे.
एकीकडे बिबट्यांची संख्या राज्यात वाढू लागल्याचे बोलले जात असले तरी दुसरीकडे बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. बिबट्यांच्या नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे. राज्यात यावर्षी ८४ बिबटे नैसर्गिकरीत्या मरण पावले आहे, तर चार बिबट्यांची शिकार झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. चालू वर्षी राज्यात रेल्वेच्या धडकेत फक्त नाशकात गेल्या बुधवारी (दि.१५) एका बिबट्याचा मृत्यू झाला.
विहिरींमध्ये ३४ बिबटे बुडाले
राज्यात चालू वर्षी ३४ बिबटे उघड्या विहिरींमध्ये बुडून मृत्युमुखी पडले तर २९ बिबट्यांना वाहनांनी चिरडले आहे. एकूण ६४ बिबट्यांचा राज्यात अपघाती मृत्यू झाला आहे. यापैकी आठ ते दहा बिबटे नाशिक सर्कलमध्ये वेगवेगळ्या रस्त्यांवर मृत्युमुखी पडले आहेत. नाशिक सर्कलमध्ये ३७ बिबट्यांचा नैसर्गिक, तर १६ बिबट्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.
वनवृत्तनिहाय बिबट्यांचा मृत्यू असा...
मुंबई पूर्व- १
मुंबई पश्चिम- २
ठाणे- ५
अमरावती- ३
औरंगाबाद- १२
चंद्रपुर- १६
धुळे- ४
नागपूर- १२
नाशिक- ६६
पुणे- ३३
यवतमाळ- ३
गडचिरोली- १
कोल्हापूर- १
बिबट्यांची शिकार नियंत्रणात
बिबट्यांच्या शिकारीवर वनविभागाला नियंत्रण मिळविणे यावर्षी शक्य झाले आहे. मागील वर्षी राज्यात १७ बिबट्यांची शिकार झाली होती, तर यावर्षी केवळ ४ बिबट्यांची शिकार झाली. २०१९ साली नऊ बिबट्यांचा शिकाऱ्यांनी बळी घेतला होता.