६६० मेगावॉट प्रकल्प रखडला

By admin | Published: November 29, 2015 10:50 PM2015-11-29T22:50:35+5:302015-11-29T22:51:53+5:30

इच्छाशक्तीचा अभाव : अनुकूल वातावरण, पाण्याची उपलब्धता असतानाही दिरंगाई

660 MW project stops | ६६० मेगावॉट प्रकल्प रखडला

६६० मेगावॉट प्रकल्प रखडला

Next

योगेश मानकर,सामनगाव
मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना केवळ प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर आतापर्यंत त्याठिकाणी विजेचे आठ संच तयार झालेले आहेत. मात्र पाण्याची उपलब्धता असतानाही नाशिकच्या एकलहरे येथील ६६० मेगावॉट प्रकल्पाबाबत शासनाकडून चालढकल सुरू असून, राजकीय इच्छाशक्ती आणि प्राबल्य नसल्याने हा प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
पाण्याची समस्या असतानाही भुसावळ येथील बंद केलेला संच क्रमांक दोन पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. तर एकलहरे येथे प्रस्तावित असलेल्या ६६० मेगावॉटच्या प्रकल्पाचे घोडे अजूनही अडलेलेच आहे. निर्मितीचे अनेक रेकॉर्ड रचणाऱ्या या वीज केंद्राला फक्त राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने विलंब होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
राज्यात सर्व औष्णिक वीज केंद्रांमध्ये नाशिक औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने २०१५ पर्यंत वीज निर्मितीत सातत्य ठेवत अनेक विक्रम व बचत करीत उद्दिष्ट साध्य करण्यात बाजी मारली आहे. या ठिकाणी ३५ वर्षे जुने वीजनिर्मिती संच आहेत. ते केव्हाही बंद करण्याची सूचना येऊ शकते त्यामुळे ६६० प्रकल्पाला चालना मिळणे अपेक्षित आहे. २०१० पासून मंजुरी मिळालेल्या बदली संचच्या कामाला अद्यापपावेतो सुरुवात होत नाही? पाच वर्ष उलटूनही राजकीय इच्छाशक्ती जागृत का होत नाही? असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहे.
एकलहरे वीज केंद्राने देशपातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केलेली असताना येथील संच पुढे नूतनीकरण करून कार्यान्वित ठेवण्यासाठी विचार का केला जात नाही. वीज महाग पडते या एकमेव कारणावरून गेल्या दोन-चार वर्षांपासून या वीज केंद्राला बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. कुठलाही कारखाना सुस्थितीत चालण्यासाठी त्याला लागणारे इंधन व पाणी हे चांगले मिळाले तर उत्तम काम करते. येथे उलट परिस्थिती आहे. दूषित पाणी व खराब कोळसा यांच्याद्वारे उचांकी वीजनिर्मिती केली जात आहे. प्रत्येक संचाचे ओव्हरआॅयलिंग दरवर्षी केले जाते ते काम दोन-तीन वर्ष होत नाही तर मग ही निर्मिती महागच पडणार. या बाबींचा विचार होणे गरजेचे असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाच वर्षांपासून बदली संचाचे काम तसूभरही पुढे सरकले नसल्याने जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणारे एकलहरे औष्णिक वीज केंद्र केवळ शासनाची इच्छाशक्ती नसल्याने थांबले आहे. येथील वातावरण, भौगोलिक परिस्थिती वीज कामगार, अधिकाऱ्यांचे कौशल्य, संचासाठी लागणारी जागा, पाणी, रेल्वे मार्ग सर्व सुविधा उपलब्ध असताना दिरंगाई का केली जात आहे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

शासनाकडून निराशाजनक प्रतिसाद
भुसावळ येथील बंद केलेले संच तेथील खंबीर लोकप्रतिनिधींमुळे सुरू झाले आहेत, तर येथील उत्तम रीतीने चाललेले संच बंद पाडण्याचे कारस्थान सुरू असून, प्रस्तावित संच रखडलेल्या अवस्थेत आहे. या सार्‍या वेळकाढू धोरणाचा वेगळा अर्थ लावला जात आहे. या प्रकल्पाच्या कामात चिमणीच्या उंचीचा अडसर येत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी गेल्या सोमवारी  ऊर्जा मंत्र्यांच्या दालनात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, सरपंच शंकर धनवटे, नवृत्ती चाफळकर, विजय जगताप, विशाल संगमनेरे, शेखर आहेर यांच्यात बैठकीदरम्यान चर्चा झाली. मात्र मंत्री महोदयांकडून या प्रकल्पाबद्दल निराशाजनक प्रतिसाद मिळाल्याचे या लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

Web Title: 660 MW project stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.