चास येथे बिबट्यांनी केल्या ७ शेळ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:40 AM2018-03-19T00:40:21+5:302018-03-19T00:40:21+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास शिवारात वस्तीसमोर दिवसाढवळ्या तीन बिबट्यांनी ७ शेळ्या फस्त केल्याची घटना शनिवारी (दि.१७) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास शिवारात वस्तीसमोर दिवसाढवळ्या तीन बिबट्यांनी ७ शेळ्या फस्त केल्याची घटना शनिवारी (दि.१७) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, व अकोले तालुक्यातील डोंगरगाव आदी भागात डोंगराळ भाग असल्याने नेहमीच या दिवसात बिबट्यांच्या वावर असतो. चास - नळवाडी रस्त्यावर बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव खैरनार यांच्या वस्तीशेजारी तुकाराम एकनाथ ढाकणे हे गट नंबर २२३ मध्ये राहतात. घराच्या शेजारीच त्यांची शेतजमीन आहे. ढाकणे यांच्या घरासमोर १० ते ११ शेळ्या दावणीला बांधलेल्या होत्या. शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तीन बिबट्यांनी अचानक शेळ्यांवर हल्ला चढवला. ढाकणे कुटुंबीयासमोर हल्ला झाल्याने त्यांची अक्षरश: भांबेरी उडाली होती. त्यांच्या डोळ्यादेखत बिबट्यांनी शेळ्यांची चिरफाड करत ७ शेळ्या फस्त केल्या. ढाकणे यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा होऊ लागले, त्यानंतर सदरची घटना वनविभागास कळविण्यात आली. सुमारे पन्नास ते साठ हजारांच्या आसपास ढाकणे यांचे नुकसान झाल्याचे कळते. दरम्यान दुपारी दोन वाजता नांदूरशिंगोटे वनपाल पी.ए.सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली़सिन्नर तालुक्यात अनेक दिवसापासून वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. भोजापूर परिसरात दोन महिन्यापूर्वी दुचाकीस्वारावर एका बिबट्याने हल्ला केला होता. आजमितीला दोन ते तीन बिबटे दिवसभर वावरताना दिसत असल्याने वनविभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.