ट्रकला कट मारल्याच्या कारणावरून वऱ्हाडाला मारहाण, 7 जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 07:24 AM2020-02-17T07:24:50+5:302020-02-17T07:30:41+5:30

ट्रकला कट मारल्याच्या कारणावरून वऱ्हाडाला मारहाण करण्यात आली. यामध्ये सात जण जखमी झाले.

7 injured in fighting between two groups in malegaon nashik | ट्रकला कट मारल्याच्या कारणावरून वऱ्हाडाला मारहाण, 7 जण जखमी 

ट्रकला कट मारल्याच्या कारणावरून वऱ्हाडाला मारहाण, 7 जण जखमी 

Next
ठळक मुद्देट्रकला कट मारल्याच्या कारणावरून वऱ्हाडाला मारहाण करण्यात आली. यामध्ये सात जण जखमी झाले. घटनेच्या निषेधार्थ वऱ्हाडींनी मनमाड मालेगाव रस्त्यावर ठाण मांडल्याने सुमारे दीड तास वाहतूक ठप्प.पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मालेगाव मध्य (नाशिक) - तालुक्यातील जळगाव चोंडी येथे रात्री बाराच्या सुमारास ट्रकला कट मारल्याच्या कारणावरून वऱ्हाडाला मारहाण करण्यात आली. यामध्ये सात जण जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ वऱ्हाडींनी मनमाड मालेगाव रस्त्यावर ठाण मांडल्याने सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाल्याने दुतर्फा वाहनांची रांग लागली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांची समजूत काढत वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते.

मालेगाव शहरातील कमालपुरा येथिल कमरुद्दीन हाजी शमसुद्दीन शेख यांच्या मुलाचा (मुशिर शेख)येवला येथुन साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून वऱ्हाड मालेगावी परत येत होते. मनमाड जवळ टँकर ( एम एच १८एए९३६७) हॉटेलमधून अचानक रस्त्यावर आल्याने ट्रक (एम एच १८एए६४१४) चालक मोहम्मद हनिफ व टॅंकर चालक सुनिल पुंडलिक चोरमले रा.चोंडी यांच्यात वाद झाल्याने सोडवासोडव करण्यात आली. यावेळी सुनिल चोरमले याने फोन करुन काही जणांना बोलावून घेतले व चोंडी गावाजवळ ट्रकला अडवून चालकासह महिलांना मारहाण करण्यात आली. यावेळी चोंडी पोलीस चौकी येथे कर्तव्यावर असलेले तालुका पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

हलीमा मुश्ताक अहमद,जुबैदा मोहम्मद अय्युब, एजाज अहमद मुश्ताक अहमद (१३) मोहम्मद हनिफ अय्युब, निसार अहमद जाफर, मोहम्मद इब्राहीम मोहम्मद अय्युब जखमी झाले. सदर प्रकाराची  माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे यांनी पोलीस ताफ्यासह धाव घेतली. मारहाण करणाऱ्यांपैकी दोन जणांना महिलांनी पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिले. बातमी शहरात कळताच  राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वऱ्हाडी मंडळींनी सुमारे दीड तास रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. रत्नाकर नवले यांनी वऱ्हाडी मंडळींची समजूत काढत वाहतूक सुरळीत करण्यात आली. जखमींना उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 
 

Web Title: 7 injured in fighting between two groups in malegaon nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.