शहरात आज ७ रुग्ण : जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा ९३६वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:25 PM2020-05-23T22:25:31+5:302020-05-23T22:29:55+5:30
शनिवारी संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार येथील नाईकवाडीपुरा भागात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर वडाळारोडवरील शिवाजीवाडी झोपडपट्टीत पुन्हा एक रुग्ण मिळाला.
नाशिक : जिल्ह्यासह शहरातही आता कोरोनाचा फास अधिक भक्कम होत चालला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून गावठाण व झोपडपट्टी भागांत कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत शहराचा कोरोनाबाधितांचा आकडा ७६ इतका झाला. तसेच जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या ९३६वर पोहचली. नाशिक ग्रामीण भागाचा आकडा १२५वर पोहचला आणि मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६९६ इतकी झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४७ कोरोनाग्रस्त रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरात ३ तर मालेगावात ४४ कोरोनाग्रस्त रुग्ण मरण पावले आहेत. आतापर्यंत ६७३ कोरोनाबाधित रूग्ण पुर्णपणे ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
शहरातदेखील कोरोना आजाराचा फैलाव आता वेग धरू लागला आहे. यामध्ये गावठाण भागात आता कोरोनाचा शिरकाव अधिक चिंताजनक ठरणारा आहे. जुने नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचा सिलसिला सुरूच आहे. शनिवारी संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार येथील नाईकवाडीपुरा भागात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर वडाळारोडवरील शिवाजीवाडी झोपडपट्टीत पुन्हा एक रुग्ण मिळाला. टाकळी समतानगर येथील एका वृध्द कोरोनाग्रस्त रुग्णाचा नमुना चाचणी अहवाल त्याच्या मृत्यूनंतर शनिवारी पॉझिटिव्ह आला. तसेच आज दुपारी प्राप्त अहवालानुसार शहरातील कॉलेजरोड भागात एक तर सिडकोच्या राणाप्रताप चौकात एक कोरोनाबाधित रुग्ण मिळून आला.
शिवाजीवाडी या नासर्डीनदीच्या काठालगत असलेल्या झोपडपट्टीमध्येही कोरोनाबाधितांची संख्य आता २ झाली. वडाळागावातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा शुक्रवारी ४ वर कायम आहे. तसेच जुन्या नाशकातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ७ वर पोहचला आहे.
शहरातील झोपडपट्टया अद्याप कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित होत्या; मात्र गुरूवारपासून काही झोपडपट्टयांमध्येही कोरोनाबाधित रूग्ण आढळून येऊ लागल्याने आता भीती वाढली आहे. मनपा आरोग्यप्रशासनापुढे कोरोनाचे संक्रमण झोपडपट्टयांमध्ये तसेच गावठाण भागात रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
शहराचा गावठाण व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकनंतर आता वडाळागावातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे आता परिस्थिती गंभीर बनत चालली असून नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक गरज असल्यास तोंडाला मास्क लावून परस्परांमधील अंतर राखून घराबाहेर पडावे, तत्काळ काम आटोपून पुन्हा घरात जावे, लहान मुले, वृध्द व्यक्तींची अधिकाधिक काळजी घ्यावी, घरातदेखील वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावीत अशा विविध सुचना ध्वनीक्षेपकावरून संपुर्ण परिसरात दिल्या जात होत्या.
नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच नागरिकांचे जत्थे शहरात पहावयास मिळत आहे. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान शहरातील बाजारपेठांचा परिसर गजबजून जात आहे.