मालेगावी ७० टक्के यंत्रमाग पूर्वपदावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 09:16 PM2020-07-24T21:16:56+5:302020-07-25T01:07:13+5:30
मालेगाव : लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यापासून बंद असलेले येथील ७० टक्के यंत्रमाग उद्योग सुरू झाले असले तरी यंत्रमाग उद्योजकांचा भारतातील कापड व्यापाऱ्यांशी संपर्कच होवू न शकल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनपूर्वी व्यापाऱ्यांकडे उत्पादित कापड पडून असल्याने उद्योजक हतबल झाले आहेत.
मालेगाव : (शफीक शेख ) लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यापासून बंद असलेले येथील ७० टक्के यंत्रमाग उद्योग सुरू झाले असले तरी यंत्रमाग उद्योजकांचा भारतातील कापड व्यापाऱ्यांशी संपर्कच होवू न शकल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनपूर्वी व्यापाऱ्यांकडे उत्पादित कापड पडून असल्याने उद्योजक हतबल झाले आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे शासनाच्या आदेशामुळे शहरातील यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्यात आले. दहा दिवस काही कारखाने सुरू ठेवले; मात्र भारतातील कापड व्यापाºयांशी असलेला मालेगाव शहरातील यंत्रमाग उद्योजकांचा
संपर्क तुटला. ‘ग्रे क्लॉथ’ माल भारतात ज्या भागात जात होता; मार्चनंतर त्या भागात हा माल जाऊ शकला नाही. कारखानदारांकडून स्थानिक कामगारांना मदतीचा हात राज्यात लॉकडाऊनमुळे इतर ठिकाणी देखील बिकट परिस्थिती आहे. त्यात भिवंडी, इचलकरंजी, विटा, सांगली, सोलापूर, नवीमुंबई येथे आजही कठीण परिस्थिती आहे. यंत्रमाग व्यवसाय पूर्व पदावर येण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे.मालेगावात ९५ टक्के कामगार स्थानिक आहेत. लॉकडाऊन काळात यंत्रमाग कारखानदारांनी त्यांना आर्थिक मदत देवून सांभाळले. परिणामी गेल्या चार महिन्यात यंत्रमाग उद्योजकांचे कोट्यवधी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव गरीबांना जकात देतात. मदरसे आणि गरीबांना जकात न देता यंत्रमाग कारखानदारांनी आपल्या यंत्रमागावरील गरीब मजुरांना जकातीचे वाटप केले. आपापल्या मजुरांना परिस्थितीनुसार हप्ता किंवा महिन्यातून चांगली आर्थिक मदत केल्याने यंत्रमाग मजुरांचे घर चालू शकले. काही सामाजिक संस्था एनजीओ यांनी धान्य, तांदूळ यांचे कीट वाटले. अतिरिक्त रक्कम कामगारांना दिली. काही नातेवाईकांनी आणि शेजारील लोकांनी मदत केली.दोन महिन्यांपासून पेमेंट नाही. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पाली, बालोतरा, मुंबई येथून पेमेंट येत नव्हते. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे हजारो कोटी रूपयांचे चलन थांबले होते. आजही मुंबई मार्केटमध्ये मालेगावच्या यंत्रमागधारकांचे पैसे अडकले आहेत. पाली आणि बालोतरा येथील काम अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नाही.
----------------------------
मालेगावात प्युवर कॉटन, कॉटन पॉलिस्टर आणि मिक्स पॉलिस्टर या तिन्ही प्रकारचे कापड राजस्थान, गुजरात, नवी मुंबई, कलकत्ता येथे प्रक्रियेसाठी जातो. नऊवारी, सातवारी, बॉर्डरची रंगीत साडी मराठवाडा आणि विदर्भात पाठवली जाते; परंतु त्यांची आजही परिस्थिती खराब आहे.- शब्बीर डेगवाले, यंत्रमाग उद्योजक
उत्पादीत केलेला कापड देशातील बाजारपेठेत जावू शकला नाही. जे कापड बाजारपेठेत पाठविले. लॉकडाऊनमुळे रस्त्यातच अडकले. त्यामुळे उद्योजकांचे नुकसान झाले. प्रशासनाने उद्योजकांशी चर्चा करुन अडचणी सोडविल्याने परिस्थिती सुधारत आहेत.
- ओमप्रकाश गगराणी, अध्यक्ष व्यापारी, उद्योजक महासंघ