राज्यात नाशकात सर्वाधिक ७० बिबट्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:29+5:302020-12-11T04:41:29+5:30
सह्याद्रीची पर्वतरांगा गोदावरी, दारणा, कादवासारख्या नद्यांचे प्रशस्त खोरे, उसाची बागायती शेती, गंगापूर, दारणा, वाघाडसारखी लहान-मोठी धरणे त्यांची कालवे राखीव ...
सह्याद्रीची पर्वतरांगा गोदावरी, दारणा, कादवासारख्या नद्यांचे प्रशस्त खोरे, उसाची बागायती शेती, गंगापूर, दारणा, वाघाडसारखी लहान-मोठी धरणे त्यांची कालवे राखीव वने यामुळे नाशिकला बिबट्यांचा अधिवासाकरिता पोषक असे भौगोलिक वातावरण आहे. यामुळे नाशिक पूर्व तालुक्यासह शहरालगतच्या खेड्यांमध्ये बिबट्यांचा वावर सातत्याने आढळून येतो. वन विभागाकडून ठिकठिकाणी दररोज पिंजरे तैनात केले जातात अन् बिबट्यांना दर दिवसाआड जेरबंद केले जाते. मागील वर्षाच्या तुलनेत ३९ बिबटे मृत्युमुखी पडले होते. यावर्षी यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
लॉकडाऊनपासून आतापर्यंत नाशिक पूर्व-पश्चिम विभागातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड, येवला, चांदवड, दिंडोरी आदी भागातून सुमारे वीसपेक्षा अधिक बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे. यापैकी सर्वाधिक डझनभर बिबटे गोदावरीच्या खोऱ्यात नाशिक वनपरिक्षेत्रातील तालुक्याच्या पूर्व भागांमधील गावांमध्ये जेरबंद झाले आहे. लॉकडाऊन काळात नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात बिबट-मानव संघर्षदेखील उद्भवला होता. यावेळी तिघा चिमुकल्यांसह एका वृध्दाचा बळी गेला होता. त्यानंतर इगतपुरी तालुक्यात महिनाभरापूर्वी दोघा बालिकांचा बिबट्याचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.
--इन्फो--
बिबट्यांच्या मृत्यूबाबत सगळ्यांचे ‘मौन’
बिबटे वाढल्याचे बोलले जाते; मात्र बिबट्यांच्या मृत्यूबाबत फारशी चर्चा होत नाही. ज्याप्रमाणे नाशकात बिबटे मोठ्या संख्येने जेरबंद झालेत त्याचप्रमाणे बिबटे मृतावस्थेतदेखील मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे; मात्र हे वास्तव सहजासहजी मनुष्यप्राणी स्वीकारणार नाही. नाशकात यावर्षी सुमारे ७० बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये बहुतांश बिबट्यांना माणसानेच त्यांच्या भरधाव वाहनांखाली चिरडून टाकले तर काही बिबट्यांना उघड्या विहिरींमध्ये कोसळून जलसमाधी घ्यावी लागली, यालाही माणसांचेच दुर्लक्ष कारणीभूत ठरतेय.
---इन्फो--
नाशिकपाठोपाठ पुण्याचा क्रमांक
नाशिक वनवृत्तात अहमदनगरचाही समावेश होतो. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांचे मिळून सुमारे ७० बिबटे यावर्षी नोव्हेंबरपर्यंत मृत्युमुखी पडल्याचाी नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. त्यापाठोपाठ पुण्याचा दुसरा क्रमांक लागतो. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २६ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत तर कोल्हापूरमध्ये २६ आणि धुळ्यात १० बिबटे गतप्राण झाले. राज्यातील या शहरांमध्ये बिबटे मृत्यूची संख्या दोन आकडी आहेत, उर्वरित जिल्ह्यांत ती एक आकडी आहे.
----
फोटो आर वर १०फॉरेस्ट नावाने.