छावणी परिषदेसाठी ७० टक्के मतदान
By admin | Published: January 12, 2015 12:28 AM2015-01-12T00:28:57+5:302015-01-12T00:29:09+5:30
निवडणूक : उमेदवार समर्थकांमध्ये बाचाबाची; तणावपूर्ण शांतता
देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या जागेसाठी ७० टक्के मतदान झाले असून, सोमवारी (दि. १२) सकाळी आठ वाजता नूतन विद्यामंदिर येथे मतमोजणी होणार आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीसाठी मतदार स्वयंस्फूर्तीने बाहेर येत असल्याने मतदानाचा वेग चांगलाच दिसत होता. त्यामुळे सकाळपासून सर्वच वॉर्डात रांगा दिसत होत्या. वॉर्ड नं १ मध्ये दुपारच्या सुमारास दोघा उमेदवारांच्या समर्थकांमधील वाद पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मिटला. वॉर्ड दोनमध्ये माजी आमदारांना दुसऱ्या उमेदवाराच्या समर्थकाने धक्काबुक्की करण्याचे वृत्त आहे. यामुळे वातावरण तणावपूर्ण होते. वॉर्ड क्रमांक सहामध्ये दोघा उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. वॉर्ड सातमध्ये बाहेर गावातील उमेदवार आल्याने उमेदवारांनी तक्रार करत मतदान करून देण्याच्या भूमिकेमुळे शिंगवे बहुला येथे वातावरण तंग झाले होते.
वॉर्ड क्रमांक एकमध्ये ४३६९ पैकी ३०९९ वॉर्ड दोनमध्ये ५२०२ पैकी ३१०५ तीनमध्ये ५१०७ पैकी ३७७७ चारमध्ये ४३३२ पैकी ३४१६ पाचमध्ये ४३२३ पैकी २७४०, सहामध्ये ४३२३ पैकी २९८९, सातमध्ये ५१८३ पैकी ३५२१, तर आठमध्ये ४८५६ पैकी ३७५६ मतदारांनी मतदान केले. देवळाली छावणी परिषदेची निवडणूक प्रथमच पक्षीय चिन्हांवर होत असल्याने पक्षीय पातळीवर या निवडणुकीकडे विशेष लक्ष होेते. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी वाहने भाडेतत्त्वावर आणली होते. छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते, यतिन वाघ, अजय बोरस्ते, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर आदि नेते उपस्थित होते. मतमोजणी सकाळी ८ वाजता नूतन विद्यामंदिर, भगूर बसस्टॅण्डसमोर होणार आहे. (वार्ताहर)