दोन वर्षांत रस्ते बांधणीवर ७०० कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:41 AM2017-07-25T00:41:17+5:302017-07-25T00:41:31+5:30
नाशिक : गेल्या दोन वर्षांत रस्त्यांवर तब्बल ७०० कोटी रुपये खर्च होऊनही पावसाने काही भागांत महापालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
धनंजय वाखारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दोन वर्षांत आधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ४६५ कोटी, तर नंतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९२ कोटी रुपये केवळ रस्त्यांच्या कामांवर खर्च करणाऱ्या नाशिक महापालिकेचा आर्थिक संसार कष्टदायक बनला असतानाही चालू आर्थिक वर्षात सत्ताधारी भाजपाने पुन्हा एकदा रस्त्यांसाठी तब्बल ३०० कोटी रुपये ओतण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी सन २०१७-१८च्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आलेली आहे. गेल्या दोन वर्षांत रस्त्यांवर तब्बल ७०० कोटी रुपये खर्च होऊनही पावसाने काही भागांत महापालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सन २०१५-१६ मध्ये नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा पार पडला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने महापालिकेला सुमारे ११५० कोटी रुपये अनुदान दिले. त्यातील ४६५ कोटी रुपये महापालिकेने केवळ रस्ते बांधणीवर खर्च केले. सन २००३-०४ च्या सिंहस्थात झालेल्या काही बाह्य रिंगरोडवरच पुन्हा डांबर ओतण्याचा प्रकार झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध रान पेटविले होते. सिंहस्थाच्या काळात काही नव्याने रिंगरोड व पुलांची निर्मिती झाली. त्यामुळे बाह्य लिंकरोड चकचकीत झाले. मात्र, त्यावेळी शहरातील अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले. त्याबद्दलही सत्ताधारी मनसेविरुद्ध टीका झाली. सन २०१५-१६ मध्ये सुमारे ४६५ कोटी रुपये रस्तेविकासावर खर्च झाल्यानंतर २०१७मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी कॉलनीरोडच्या कामांसाठी १९२ कोटी रुपये खर्चाची तरतूद करुन घेतली. त्यानुसार, अजूनही त्याअंतर्गत कामे सुरु आहेत. तत्पूर्वी, महापालिका आयुक्तांनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात रस्ते बांधणीसाठी ४९.६६ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यात खडीचे रस्ते तयार करणे, खडीकरण केलेले रस्ते डांबरी करणे, काही डांबरी रस्त्यांचे रुंदीकरण, रिसरफेसिंग आदी कामांचा समावेश होता. प्रत्यक्षात या कामांवर आर्थिक वर्षात ४७.४२ कोटी रुपयेच खर्च झाले. त्यात ७ कि.मी.चे खडीकरण, ५४ कि.मी.चे डांबरीकरण, १२ कि.मी.चे काँक्रिटीकरण झाले. दोन वर्षांत महापालिकेने सिंहस्थात मिळालेल्या अनुदानासह रस्ते बांधणीवर तब्बल ७०० कोटी रुपये खर्ची घातले. मात्र, चालू वर्षी जून-जुलैच्या महिन्यातील पावसातच काही भागांत रस्त्यांची अवस्था बिकट बनलेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या एकूणच कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले.
चालू आर्थिक वर्षात ३०० कोटींची तरतूद
दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर निधी रस्त्यांच्या कामांवर खर्च झाला. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात एकूणच आर्थिक स्थिती लक्षात घेत डी.पी. रस्ते विकसित करण्यासाठी पाच कोटींची स्वतंत्र तरतूद केली. मात्र, स्थायी समितीने सर्व ३१ प्रभागांतील रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरण व कॉँक्रिटीकरणासाठी ९४.९४ कोटी रुपयांची शिफारस केली. त्यात महासभेने तब्बल २०५.०५ कोटी रुपयांची भर घातली. त्यामुळे एकूण तरतूद ३०० कोटींवर गेली आहे. महापालिकेची एकूणच उत्पन्नाची जमा बाजू पाहता सत्ताधारी भाजपा एवढा निधी एकट्या रस्त्यांच्या कामांसाठी कसा आणि कुठून आणेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.