विनामास्क फिरणाऱ्या ७ हजार नाशिककरांना दंडाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:13 AM2021-04-10T04:13:53+5:302021-04-10T04:13:53+5:30
नाशिक : एकीकडे नाशकात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे, तर दुसरीकडे मात्र अद्यापही बहुतांश नागरिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याबाबत ...
नाशिक : एकीकडे नाशकात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे, तर दुसरीकडे मात्र अद्यापही बहुतांश नागरिकांकडून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याबाबत उदासिनता दाखवली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मार्चचा पंधरवडा उलटल्यापासून आतापर्यंत शहरात पोलिसांनी तब्बल ७ हजार लोकांवर मास्क न लावल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच ६८ लोकांवर गुन्हे दाखल करत ४३३ व्यावसायिकांनाही दंडाचा दणका दिला आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या पंचवटी, आडगाव, म्हसरुळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर व मुंबई नाका या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तसेच परिमंडळ - २च्या उर्वरित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दिनांक १७ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत पोलिसांनी मास्क न लावणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईतून सुमारे ४६ लाखांचा दंड आतापर्यंत वसूल केला गेला आहे. या कारवाईत विनामास्क फिरणाऱ्या ४ हजार २७ नागरिकांकडून १२ लाख ९२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला असून, ४५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या २०५ व्यावसायिकांवर कारवाई करत २ लाख २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच वेळेचे बंधन न पाळणाऱ्या १८८ व्यावसायिकांना ३ लाख ९२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, १२१ लोकांवर रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करत ७४ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आणि ७२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
परिमंडळ २ मधील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या २ हजार ८४३ बेफिकीर लोकांवर कारवाईचा बडगा उगारत एकूण १५ लाख ५७ हजार ६०० रूपये इतका दंड आकारण्यात आला. तसेच भादंवि कलम १८८प्रमाणे २४ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलेल्या २३ थुंकीबहाद्दर निष्काळजीपणे वागणाऱ्यांवर कारवाई करत २४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रात्रीच्या संचारबंदीचे हेतूपुरस्सर उल्लंघन करणाऱ्या ३५ नागरिकांकडून एकूण ५२ हजार ५०० रूपये दंड वसूल केला आहे. आतापर्यंत ८९५ नागरिकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली आहे.
--------इन्फो----
४१६ आस्थापनांना ११ लाखांचा दंड
ज्या आस्थापनाचालकांनी आदेश व सूचनांचे उल्लंघन केले, अशा परिमंडळ -१ मधील १८८ आस्थापनांच्या चालकांकडून ३ लाख ९२ हजारांचा दंड वसूल केला गेला. तसेच परिमंडळ - २ मधील २२८ आस्थापनांवर कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत ७ लाख ७५ हजार २०० रूपये दंड ठोठावला. प्रशासनाने निर्गमित केलेल्या वेळेची मर्यादा न पाळणाऱ्या २७ आस्थापनांवर कारवाई करून १ लाख ४१ हजार रुपयांचा दंड करण्यात आला तर ८ आस्थापनांना कोरोना निर्मूलन होईपर्यंत टाळे ठोकण्यात आले.