जिल्ह्यात तब्बल ७२ बळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:40+5:302021-06-10T04:11:40+5:30
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. ९) तब्बल ७२ बळींची नोंद झाली असून त्यात एकट्या नाशिक महापालिका क्षेत्रातील ४५ , ...
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. ९) तब्बल ७२ बळींची नोंद झाली असून त्यात एकट्या नाशिक महापालिका क्षेत्रातील ४५ , नाशिक ग्रामीणचे २३ आणि मालेगाव मनपाच्या ४ बळींचा समावेश आहे. ऑक्सिजन दुर्घटनेच्या दिवशी गेलेल्या एकाच दिवसातील बळींखालोखाल ही दुसऱ्या क्रमांकाची बळीसंख्या ठरली आहे.
दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात नवीन रुग्णसंख्येत अवघी ३८३ रुग्णांची भर पडली असून ६८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या ६८० रुग्णांपैकी नाशिक मनपाचे ११५, ग्रामीणचे २४८, मालेगाव मनपाचे ११ तर जिल्हाबाह्य ९ रुग्णांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यातील बळींच्या संख्येने ५ हजार बळींचा टप्पा पार केला होता. त्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी बळींमध्ये झालेली ही ७२ बळींची वाढ सामान्य नागरिकांना संभ्रमात टाकणारी ठरली आहे. या बळींमुळे आतापर्यंत एकूण ५१०३ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात २४७१ बळी नाशिक ग्रामीणचे, २२०९ बळी नाशिक मनपा क्षेत्रातील ३२३ मालेगाव मनपा क्षेत्रातील तर ११ बळी जिल्हाबाह्य रुग्णांचे आहेत. मात्र, ही नोंद बुधवारच्या एकाच दिवसातील आहे, की काही अन्य न झालेल्या मृत्युनोंदीची एकत्रित नोंद एकाच दिवशी झाल्याची आरोग्य वर्तुळात चर्चा आहे.
इन्फो
२१ एप्रिलनंतरचे सर्वाधिक
नाशिक शहरात २१ एप्रिलच्या सकाळी झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमध्ये ऑक्सिजन भरताना झालेल्या दुर्घटनेच्या दिवशी एकूण बळींची नोंद ९० वर गेली होती. मात्र, त्यातही २४ बळी हे ऑक्सिजन दुर्घटनेमुळे ऑक्सिजन मिळू न शकल्याने गेले होते. त्या घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता ते दुर्दैवी अपघाती मृत्यू होते. म्हणजे त्या आपत्तीतील बळींचा आकडा बाजूला केल्यास त्या दिवसापेक्षाही अधिकचे बळी काल गेल्याची नोंद झाली आहे.
इन्फो
प्रलंबित हजारहून अधिक
नवीन बाधित रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सातत्याने दुपटीहून अधिक राहत असल्याने प्रलंबित अहवालांच्या संख्येतही मोठी घट आली आहे. ही संख्या बुधवारी १०४४ वर आली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे ४३०, नाशिक मनपाचे २९८ तर मालेगाव मनपाचे ३१६ अहवाल प्रलंबित आहेत.