पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी 73 बस गाड्या, नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल
By संजय पाठक | Published: January 12, 2024 09:17 AM2024-01-12T09:17:18+5:302024-01-12T09:17:53+5:30
युवा महोत्सवाचे पथक, वारकरी पथक, नाशिक महापालिकेचे लेझीम पथक अशा विविध कारणांसाठी 73 बसेस घेण्यात आल्यामुळे प्रवासी सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.
नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होत आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या सिटी लिंकच्या 73 प्रवासी बस विविध कामांसाठी वापरण्यात येत आहेत. परिणामी प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
पंचवटीतील तपोवन येथे सिटी लिंकचा बस डेपो असून तेथे 150 बस असतात. त्यातील 144 बसेस दररोज वापरत असतात. मात्र याच परिसरात पंतप्रधानांची सभा होणार असल्याने काल रात्री हा डेपो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे तेथील सर्व बसेस ईदगाह मैदान येथे स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. येथून या बस पंचवटीत उलट्या दिशेने प्रवास करून प्रवाशांना घेऊन येत आहेत. मात्र युवा महोत्सवाचे पथक, वारकरी पथक, नाशिक महापालिकेचे लेझीम पथक अशा विविध कारणांसाठी 73 बसेस घेण्यात आल्यामुळे प्रवासी सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.