बारावीत ७५ टक्के : वीरपत्नी यशोदा गोसावी यांची उत्तुंग भरारी
By अझहर शेख | Published: July 19, 2020 01:34 PM2020-07-19T13:34:11+5:302020-07-19T13:40:59+5:30
जम्मु-काश्मिरच्या नौशेरा सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवर झालेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे नायक केशव गोसावी २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात हुतात्मा झाले.
नाशिक : सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांनी आपल्या हुतात्मा पतीचे स्वप्न पुर्ण करण्याची जिद्द बाळगून बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. पदवीधर होऊन भारतीय सेनेत अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
जम्मु-काश्मिरच्या नौशेरा सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवर झालेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे नायक केशव गोसावी २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात हुतात्मा झाले. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच यशोदा यांना कन्यारत्न प्राप्त झाले. पतीच्या निधनाच्या धक्क्यातून त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या तान्हुल्या ह्यकाव्याह्णचा सांभाळ करण्यावर लक्ष केंद्रीत केले. मुलगी लहान असल्यामुळे त्यांना त्यावेळी शिक्षणाकडे वळता आले नाही; मात्र मागील वर्षी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पाथरी येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात आपल्या माहेरी बारावीला ह्यएक्स्टर्नलह्ण म्हणून प्रवेश घेतला. घरी सासरे एकटेच असल्याने व काव्या लहान असल्यामुळे नियमितपणे महाविद्यालयात जाणे शक्य नसल्याचे त्यांनी तेथील प्राचार्यांना पटवून दिले. आई, वडील, सासरे व शिक्षक वर्गाची त्यांना चांगली साथ व पाठिंबा लाभला. यामुळेच बारावीची परिक्षा ७५ टक्के गुणांनी उत्तीर्ण करता आली, असे यशोदा यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.
केवळ रात्रीचे दोन तास अभ्यास
वीरपत्नी यशोदा यांनी बारावीला कला शाखेतून प्रवेश घेतला. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते; मात्र त्यांची भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची जिद्द व हुतात्मा केशव यांचे स्वप्न पुर्ण करण्याची बांधलेली खुणगाठ यामुळे केवळ दररोज रात्री आठ ते दहा असा दोन तास घरी अभ्यास करून त्यांनी ७५ टक्के गुण मिळविले.
आयटीआयचा पदविका अभ्यासक्रम लग्नानंतरच पुर्ण केला; मात्र कालंतराने शिक्षण मागे पडले. पती शहीद झाल्यानंतर मी सुध्दा भारतीय सेनेत भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून पुढे पदवीचा मार्ग मोकळा करणे गरजेचे होते. म्हणून दोन तास मात्र अत्यंत चांगल्या पध्दतीने अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण केली.
- यशोदा केशव गोसावी, वीरपत्नी