जिल्ह्यातील ७५ टक्के शाळांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 01:11 AM2020-12-19T01:11:17+5:302020-12-19T01:12:09+5:30
नाशिक : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ११ डिसेंबरला शासन आदेश काढून शाळा , कनिष्ठ महाविद्यालय, अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित ...
नाशिक : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ११ डिसेंबरला शासन आदेश काढून शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित शाळांतील शिपाईपद संपुष्टात आणण्याचा घाट घातल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने या निर्णयाविरोधात शुक्रवारी (दि. १८) शाळा बंद आंदोलन केले. यात नाशिक जिल्ह्यातील ७५ टक्के शाळांनी कडेकोट बंद पाळला, तर काही शाळांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापकांनी काळ्या फिती लावून कामकाज करीत शाळा बंद आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाशी संलग्न नाशिक जिल्ह्यातील शिक्षण संस्थांच्या जवळपास ७५ टक्के शाळा शुक्रवारी बंद होत्या, तर काही शाळांमध्ये माध्यमिक शिक्षक संघाशी संलग्न शिक्षक व मुख्याध्यापकांच्या विविध संघटनांनी काळ्या फिती लावून कामकाज करीत शासनाच्या निर्णयाविरुद्ध निषेध नोंदविला. राज्याच्या शिक्षण विभागाने ११ डिसेंबर रोजी आदेश काढून शिपाईपद संपुष्टात आणले आहे. त्यामुळे यापुढे शिपाई, नाईक, पहारेकरी, सफाईगार, कामाठी, प्रयोगशाळा परिचर ही पदे सरळसेवेने भरता येणार नाही. परिणामी कंत्राटी पद्धतीने ही पदे भरून मानधनावर त्यांची नियुक्ती करावी लागणार असल्याचा आरोप करीत राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने शुक्रवारी शाळा बंद आंदोलन केले. तर नाशिकसारख्या ठिकाणी कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाही अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षणही बंद ठेवण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी दिली आहे.
इन्फो-१
शिक्षक संघाचे काळ्या फिती लावून काम
चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचारी तथा शिपाईपद भरती बंद करण्याच्या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाशी संलग्न मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटनांनी शुक्रवारी (दि.१७) काळ्या फिती लावून कामकाज केले, तर काही ठिकाणी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी शाळा उघडल्याच नाही त्यामुळेही शाळांचे कामकाज बंद राहिल्याचे दिसून आले. या आंदोलनात नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघटना, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी, नाशिक जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना आदी विविध संघटनांही सहभागी नोंदविल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून देण्यात आली.