७५ हजारांचे दागिने लंपास
By admin | Published: June 22, 2017 06:43 PM2017-06-22T18:43:57+5:302017-06-22T18:43:57+5:30
मागील काही दिवसांपासून द्वारका परिसरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
नाशिक : मागील काही दिवसांपासून द्वारका परिसरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरी व घरफोडीच्या घटनांनी या भागातील नागरिकांबरोबरच प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील बस थांब्यावर उभ्या असलेल्या एका महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वाहनात बसवून बॅगेमधील सोन्याचे दागिने भामट्यांनी लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, द्वारका-धुळे रस्त्यावर उभी असलेली एक प्रवासी महिला कळवण येथे जाण्यासाठी वाहनाची प्रतीक्षा करीत होती. यावेळी एका चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात इसमांनी या महिलेला कळवणला सोडून देतो, असे सांगून वाहनात बसविले. यावेळी संबंधित भामट्यांनी अपघात झाल्याचे कारण सांगून सुरतला जात असल्याची माहिती देत महिलेच्या बॅगेमधून हातोहात ७५ हजारांचे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने, दोन ग्रॅमची बाळी असे दागिने लंपास केले आहे. सदरची माहिती महिलेचा पती देवीदास तुळशीराम मालपुरे (५३) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सातत्याने गजबजलेला परिसर म्हणून द्वारका ओळखला जातो. नाशिक-पुणे, मुंबई, आग्रा, धुळे, कळवण आदि शहरांमध्ये जाणारी सर्व वाहने येथून मार्गस्थ होतात. प्रवाशांसह नागरिकांची कायम वर्दळ असते. यामुळे या भागात पोलिसांची गस्त वाढविणे गरजेचे आहे. द्वारका परिसरात मागील काही दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. या महिलेच्या लुटीच्या अगोदर अय्यप्पा मंदिरातून दीपस्तंभाची झालेली चोरी, निवृत्ती कॉम्प्लेक्समधील दुकानातून चोरीला गेलेले साहित्य अशा एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे द्वारका परिसर चर्चेत आला आहे. भद्रकाली पोलिसांच्या वतीने या भागात गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.