७५ हजार रोपांच्या लागवडीचा संकल्प
By admin | Published: June 17, 2016 12:07 AM2016-06-17T00:07:13+5:302016-06-17T00:11:16+5:30
त्र्यंबकेश्वर : वन विभागातर्फे जागतिक वनमहोत्सव साजरा होणार
त्र्यंबकेश्वर : जागतिक वनमहोत्सव व महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात दोन कोटी रोपांच्या लागवडीचे तर त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रात साधारणपणे ७५ हजार रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर शहरात यापूर्वीच तीन हजार वृक्षांचे उद्दिष्ट सांगण्यात आले. त्यापैकी १५00 खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यासाठी वृक्ष संवर्धनाच्या जाळ्या (ट्री गार्ड) दानशूर व्यक्तींकडून करून घेण्यात येत आहेत. याकामी नगराध्यक्ष विजया लढ्ढा, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे व अन्य पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.वृक्षलागवडीची पूर्वतयारी त्र्यंबक नगरपालिकेने अगोदरपासूनच केली आहे, तर वन विभागातर्फे गणपतीबारी ते लग्नस्तंभापर्यंत २५ हजार रोपे, पहिणे घाटात २0 हजार, देवगाव परिसर २५ हजार, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट बिल्वतीर्थ परिसरात एक
हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्र्यंबक नगरपालिकेला दोन हजार रोपे देण्यात येणार आहेत. गावातील दहा आखाडे, साधू-महंतांचे आश्रम याठिकाणी एक हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील कृषी विभाग आदिंसह विविध शासकीय कार्यालय परिसरात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
वन विभागातर्फे दि. १ जुलै ते ७ जुलै या सप्ताहभरात जागतिक वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राचे रेंज फॉरेस्ट अधिकारी बी. सी. चौधरी, रसाळ तसेच हरसूल वनपरिक्षेत्रातील सर्व अधिकारी हा महोत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात वन विभाग त्र्यंबक नगरपालिका, देवस्थान ट्रस्ट, खासगी संस्था, सरकारी कार्यालयांची वृक्षलागवड जवळपास एक लाख होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. (वार्ताहर)