अवघ्या अर्ध्या किमी रस्त्यासाठी ७.५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:25 AM2017-10-24T01:25:10+5:302017-10-24T01:25:15+5:30

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने शहरातील ६१३ कि.मी. रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी तब्बल एकदा २५६.३७ कोटी रुपये खर्चाचा घाट घातला, परंतु बांधकाम विभागाने प्रभागनिहाय रस्त्यांचे प्राकलन तयार करताना आपल्या अजब कारभाराचे दर्शन घडविले आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील अवघ्या अर्ध्या कि.मी.च्या रस्ता विकासासाठी चक्क ७.५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. विद्यमान उपमहापौरांच्या प्रभाग १५ मध्ये सर्वाधिक १०.४० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या गटनेत्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसण्यात आली असून, दाट लोकवस्तीच्या जुन्या नाशकातील प्रभाग १३ मध्ये अवघ्या १.८८ कि.मी. रस्त्यासाठी २.८३ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. या निधी वाटपावरून घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

 7.50 crores for only half a kilometer road | अवघ्या अर्ध्या किमी रस्त्यासाठी ७.५० कोटी

अवघ्या अर्ध्या किमी रस्त्यासाठी ७.५० कोटी

Next

नाशिक : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने शहरातील ६१३ कि.मी. रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी तब्बल एकदा २५६.३७ कोटी रुपये खर्चाचा घाट घातला, परंतु बांधकाम विभागाने प्रभागनिहाय रस्त्यांचे प्राकलन तयार करताना आपल्या अजब कारभाराचे दर्शन घडविले आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील अवघ्या अर्ध्या कि.मी.च्या रस्ता विकासासाठी चक्क ७.५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. विद्यमान उपमहापौरांच्या प्रभाग १५ मध्ये सर्वाधिक १०.४० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या गटनेत्यांच्या तोंडाला मात्र पाने पुसण्यात आली असून, दाट लोकवस्तीच्या जुन्या नाशकातील प्रभाग १३ मध्ये अवघ्या १.८८ कि.मी. रस्त्यासाठी २.८३ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. या निधी वाटपावरून घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  नुकत्याच झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपाने मागील दाराने रस्त्यांच्या विकासासाठी तब्बल २५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास विनाचर्चा मंजुरी दिली आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपा टीकेचे लक्ष बनली आहे.  या प्राकलनामध्ये सर्वाधिक ३३.३६ कि.मी.चे रस्ते प्रभाग १७ मध्ये केले जाणार असून, त्यासाठी ८.६० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.  मात्र, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या प्रभाग क्रमांक ५ मधील अवघ्या ०.५५ कि.मी. रस्त्यासाठी तब्बल ७.५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे, अर्ध्या कि.मी.च्या रस्त्याला सोन्याचा पत्रा लावणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्राकलनामध्ये सर्वाधिक निधी विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या प्रभागासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रभाग १५ मधील १२.१४ कि.मी. रस्त्यांच्या खडीकरण व डांबरी करणासाठी १०.४० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे तर सर्वात कमी निधी कॉँग्रेस-राष्टÑवादी व मनसेच्या ताब्यात असलेल्या प्रभाग क्रमांक १३ मधील अवघ्या १.८८ कि.मी. रस्त्यासाठी २.८३ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. सर्व प्रभागांसाठी सुमारे ७.५० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आल्याचा दावा शहर अभियंता उत्तम पवार करत असताना प्रभाग १३ मध्येही ७.५० कोटींचा निधी का प्रस्तावित करण्यात आला नाही, असाही प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. रस्त्यांच्या कामांसाठी निधीतील या तफावतीबाबत विरोधकांकडून प्रामुख्याने, कॉँग्रेस-राष्टÑवादीकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

Web Title:  7.50 crores for only half a kilometer road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.