७५ हजार खातेदारांनी केली ई-पीक नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:19 AM2021-09-08T04:19:38+5:302021-09-08T04:19:38+5:30
कळवण तालुक्यात ई-पीक पाहणीचा प्रयोग यशस्वीरित्या सुरू झाला असून शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्यात आल्यामुळे या उताऱ्यांवरून कोणत्या ...
कळवण तालुक्यात ई-पीक पाहणीचा प्रयोग यशस्वीरित्या सुरू झाला असून शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे देण्यात आल्यामुळे या उताऱ्यांवरून कोणत्या शेतकऱ्याने किती क्षेत्रावर कोणते पीक घेतले आहे, याची ई-पीक माहिती प्रशासनाला समजणार आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीला कळवण तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी कळवण तालुक्यात झाली आहे. ही ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना व कृषी विभागाला कृषी योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
जिल्ह्यात कळवण (९०९४)दिंडोरी (१६१८), बागलाण (४२४१), नांदगाव (२९३५), येवला (४२७४), सुरगाणा ( ४०२६), पेठ (५१८२), इगतपुरी (४७४२), त्र्यंबकेश्वर (८५९६), देवळा (२५७८), मालेगाव (७७३९), चांदवड (३४१८), नाशिक (५९९७), निफाड (६२२४), सिन्नर (४९५१) अशी ७५ हजार ५२६ खातेदार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
इन्फो...
तहसीलदार पोहोचले बांधावर
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद सातबारावर स्वत: करून घेता यावी, यासाठी शासनाने ‘ई पीक पाहणी ॲप’ सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावर पिकांची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यास हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. या ॲपबाबत विविध समस्या शेतकऱ्यांना जाणवत असल्याच्या तक्रारी आहे. त्याची खातरजमा करून घेण्यासाठी तहसीलदार कापसे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन थेट शेताच्या बांधावर पोहोचले. नांदुरी, गोबापूर, कातळगाव, आठबे, साकोरे, कळवण, कळवण खुर्द, भेंडी, बगडू येथील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शेतातील पिकांची नोंद ॲपमध्ये करून दाखविली.
इन्फो...
ई पीक नोंदणी योजना
या योजनेमुळे नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्ती किंवा दुष्काळात पीक विमा वा अन्य मदत देताना या माहितीचा फायदा होणार आहे. जमिनीचा महसुली लेख ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने गाव नमुने , दुय्यम नोंदवह्या तयार करण्याचे काम सुरू असते. सातबारा उताऱ्यावर संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीचे क्षेत्रफळ, उत्पन्न, सर्वसाधारण पीक यांची नोंद असते. दुष्काळ, अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आणि पीकविमा काढलेला असल्यास महसूल विभागाकडून गाव किंवा गटक्रमांकाद्वारे सर्वेक्षण केले जाते. ही पद्धत खर्चिक आणि वेळखाऊ आहे तसेच किती क्षेत्रावर कोणते पीक घेण्यात आले आहे, याचा निश्चित अंदाज लावता येत नाही. परिणामी पिकांची यादी प्रशासनाला शेतकरीनिहाय उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना स्वत: च्या शेतातील पिकांची सातबारामध्ये स्वत: नोंद करता येणार असल्याने पीक पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीचा अंदाज करता येणार आहे.
कोट...
सर्व शेतकऱ्यांना मोबाईलवर प्ले स्टोअरमधून हे ॲप सहज घेता येते. या ॲपमध्ये सर्वांना समजेल, अशा मराठी भाषेत सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकाची नोंद घेऊ शकतो. पिकांचा फोटो काढून ते ॲपवर ‘अपलोड’ करू शकतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा. ज्यांना अडचणी येतील त्यांच्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केली जाईल.
- बी. ए. कापसे, तहसीलदार, कळवण