आज ७५ हजार कर्मचाऱ्यांचा संप
By admin | Published: September 2, 2016 01:29 AM2016-09-02T01:29:07+5:302016-09-02T01:29:20+5:30
आज ७५ हजार कर्मचाऱ्यांचा संप
नाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील विविध संघटनांनी पुकारलेल्या संपाची तयारी पूर्ण झाली असून, नाशिक जिल्ह्णातील ७५ हजार कर्मचारी यात सहभागी होणार असल्याचा दावा संघटनांच्या निमंत्रकांनी केला आहे. नाशिक शहरातून भव्य मोर्चा तर ग्रामीण भागातील शेतकरी ठिकठिकाणी रास्ता रोको करून चक्का जाम करणार आहेत.
या संपात महसूल कर्मचारी, जिल्हा परिषद, आरोग्य, शिक्षक-शिक्षकेतर, औद्योगिक कर्मचारी, निमशासकीय संस्थांचे कर्मचारी, बॅँक कर्मचारी, एचएएल कर्मचारी अशा सर्वच संघटना सहभागी होणार आहेत. औद्योगिक कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, कंत्राटी पद्धत बंद करावी, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करू नये, कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, कोणतेही सरकारी पेन्शन नसलेल्या ज्येष्ठांना तीन हजार रुपये पेन्शन द्यावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा द्यावा, शिक्षणाचा बाजार बंद करावा आदि मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्णातील सर्व संस्था, संघटना या संपात सहभागी होणार असून, सर्व सेवा बाधित होण्याची शक्यता आहे. जिल्ह्णात ७५ हजार कर्मचारी संपात उतरतील, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्ह्णात ठिकठिकाणी रास्ता रोकोही केला जाणार आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता गोल्फ क्लब मैदानावरून कामगार, कर्मचाऱ्यांचा संयुक्त मोर्चा काढण्यात येईल. शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेकरी धडक देतील.