मालेगाव-मनमाड महामार्गावर 7600 लिटर अल्कोहोल जप्त मुंबई भरारी पथकाची कामगिरी : अल्कोहोलची चोरटी वाहतूक करणारी आंतरराज्य टोळी
By admin | Published: June 21, 2015 01:11 AM2015-06-21T01:11:47+5:302015-06-21T01:12:09+5:30
मालेगाव-मनमाड महामार्गावर 7600 लिटर अल्कोहोल जप्त मुंबई भरारी पथकाची कामगिरी : अल्कोहोलची चोरटी वाहतूक करणारी आंतरराज्य टोळी
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने मालेगाव-मनमाड रोडवरील वऱ्हाणे शिवारात शनिवारी (दि़२०) सापळा रचून अल्कोहोलची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला़ या ट्रकमधून ७ हजार ६०० लीटर अल्कोहोलची वाहतूक केली जात होती़ ट्रकसह अल्कोहोलची किंमत ६३ लाख ७८ हजार ५६० रुपये असून, भरारी पथकाने ट्रकचालकास अटक केली आहे़ मुंबई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे, जवान धनंजय भदरगे, प्रफुल्ल भोजणे, प्रवीण झाडे, प्रवीण धवणे यांना मालेगाव-मनमाड रोडवरून अल्कोहोलची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार या पथकाने सापळा रचून वऱ्हाणे शिवारातील श्रीकृष्ण ढाब्यासमोर ट्रकची (क्रमांक- एमएच ०४, डीएस २९६७) तपासणी केली असता त्यामध्ये अस्सल अल्कोहोलचे (इ़एऩए) २०० लिटरचे ३८ भरलेले बॅरल आढळून आले़ अल्कोहोल व ट्रकची किंमत ६३ लाख ७८ हजार ५६० रुपये असून, ट्रकचालक दिनेशकुमार विश्वकर्मा यास भरारी पथकाने अटक केली आहे़ साधारणत: अल्कोहोलची वाहतूक ही टँकरमधून केली जाते़ मात्र, कुणाला संशय येऊ नये म्हणून सर्रासपणे मालवाहू ट्रकवर ताडपत्री बांधून वाहतूक केली जाते़ या अल्कोहोलचा वापर अनधिकृत दारू बनविण्यासाठी केला असून, त्यामध्ये आंतरराज्य अल्कोहोल तस्कर टोळीच्या सहभागाची शक्यता आहे़ दरम्यान, ही कारवाई आयुक्त श्यामसुंदर शिंदे, निरीक्षक मुकुंद बिलोलीकर, सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येऊन यामध्ये अधिक तपास दुय्यम निरीक्षक शेवाळे हे करीत आहेत़(प्रतिनिधी)