मालेगावी २४ तासात ७७ रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 09:55 PM2020-05-09T21:55:36+5:302020-05-10T00:49:24+5:30
मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ४९७ वर जाऊन पोहोचली आहे.
मालेगाव : मालेगाव : शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी (दि.८) शहरात २८, तर शनिवारी (दि.९) सकाळी आलेल्या अहवालात ४९ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या २४ तासांत शहरातील रुग्ण संख्या ७७ ने वाढल्याने शहरातील एकूण रुग्ण संख्या ४९७ वर जाऊन पोहोचली आहे.
मालेगाव शहरात ८ एप्रिलला पहिला रूग्ण सापडल्यानंतर शहराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली. शहरात एका महिन्यातच रुग्णांचा आकडा ५०० च्या घरात जाऊन पोहोचला आहे. शुक्रवारी (दि.८) सकाळी २१, दुपारी १ तर सायंकाळी ६ याप्रमाणे एकूण २८ रुग्णांची वाढ झाली. यात २३ पुरुष तर ५ महिलांचा समावेश होता. महिला रुग्णांमध्ये एक दीड वर्षाच्या मुलीचा तर पुरुषांमध्ये २ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी (दि.९) आलेल्या अहवालात ४९ रुग्ण बाधित मिळून आले आहे. गेल्या २४ तासांत मालेगावात ७७ रुग्णांची भर पडली असून, एकूण रुग्ण संख्या ४९७ इतकी झाली आहे. यातील १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना स्वगृही पाठविण्यात आले. मालेगाव शहरासह तालुक्यातील रुग्णांमध्येदेखील वाढ होत असून, दाभाडी येथे ९, सवंदगाव १ तर चंदनपुरीत १ अशा ११ रुग्णांचा समावेश आहे.
-----------------------------
मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात द्या-भामरे
मालेगाव : कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी मालेगाव मध्य मतदारसंघ सील करून लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणी आपण केंद्र व राज्य सरकारकडे केली असल्याचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे. त्यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात भामरे यांनी मालेगाव बाह्यमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यास मालेगाव मध्यच जबाबदार असल्याचाही आरोप केला आहे.
भामरे यांनी म्हटले आहे, मालेगाव मध्यमधील जनतेला कोरोनाचे गांभीर्य नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रशासन, पोलीस, डॉक्टर यांना सहकार्य होत नाही. अनेक वेळा पोलीस व डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. त्यासाठीच आपण गेल्या महिन्यापासून राज्य शासनाकडे मालेगाव मध्य सील करून लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणी करीत आहोत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही दिले असून, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चादेखील झालेली आहे. याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा झालेली आहे. केंद्र सरकार मालेगाव मध्यमध्ये लष्कर पाठवायला तयार आहे, परंतु जोपर्यंत राज्य सरकार अधिकृत त्यासंदर्भात मागणी करीत नाही तोपर्यंत लष्कर पाठविता येत नाही. मालेगाव मध्यमधील लोक पोलीस प्रशासनाला दाद देत नाहीत, त्यामुळेच मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात देण्याची गरज असल्याचेही डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. महिनाभरापूर्वीच मालेगाव मध्य लष्कराच्या ताब्यात दिले असते तर आज रुग्णांची वाढलेली संख्या दिसली नसती.