जिल्हयातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची ७७ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:38 AM2021-02-20T04:38:06+5:302021-02-20T04:38:06+5:30
नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून, सर्वप्रकारच्या सुविधा याठिकाणी आहेत. नाशिकमधील जिल्हा रुग्णालयाच्या ...
नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय असून, सर्वप्रकारच्या सुविधा याठिकाणी आहेत. नाशिकमधील जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देताना रुग्णांची सुश्रुषा करण्याचे दायित्व सिव्हीलमधील कर्मचारी निभावत आहेत. मात्र, जिल्हा रुग्णालयातील वर्ग १ आणि वर्ग २ मधील एकूण ७७ अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने कोरोना कालावधीनंतर सिव्हीलच्या नित्य कामकाजावर यामुळे प्रचंड ताण येत आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्यत्वे ग्रामीण, आदिवासी आणि मनपा क्षेत्रातील नागरिक उपचारांसाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णांना वेळेत सुयोग्य उपचार देण्याला जिल्हा रुग्णालयाकडून प्राधान्य देण्यात येते. याठिकाणी दाखल होणारे रुग्ण हे येथे आपल्याला जिल्ह्यातील सर्वोत्तम उपचार मिळतील, या विश्वासाने दाखल होतात. जिल्हा रुग्णालयात मुख्यत्वे स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, शल्य चिकित्सक, फिजिशियन, त्वचारोग, नाक-कान-घसा तज्ज्ञ, सोनोग्राफी, आयुष विभाग यांचा समावेश आहे. मात्र, ज्या प्रमाणात आरोग्य अधिकारी आणि विशेष डॉक्टर्सची गरज आहे, तेवढे उपलब्ध झालेले नाहीत. त्या तुलनेत केवळ तीन चतुर्थांश डॉक्टर्स आणि कर्मचारीच सध्या सेवा देत असून, सिव्हीलने कोरोना काळात नागरिकांना अत्यंत चांगली सेवा देऊन एक मानदंड प्रस्थापित केला आहे.
इन्फो
सुविधा परिपूर्ण मात्र...
रुग्णसेवा अबाधित राहावी आणि तीदेखील उत्तमोत्तम देता यावी, यासाठी जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी यांचे आधुनिक यंत्र आणि तपासणी करणारे अनुभवी डॉक्टर कार्यरत असल्याने समस्येचे लवकर निदान होते. त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच रुग्णाला आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध होतात. खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञांपेक्षा जास्त सेवा जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ देतात. मोफत मिळणारी औषधे आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असली, तरी डॉक्टरांचे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे या सुविधांच्या वापरावरही मर्यादा येतात.
इन्फो
अपुऱ्या संख्याबळातही पुरस्कार
जिल्ह्यातील नागरिक सिव्हीलमधून उपचार घेण्यास प्राधान्य देतात. सिव्हीलमध्ये दररोज शेकडो रुग्ण दाखल होतात, तर बाह्यरुग्ण विभागात उपचार घेऊन हजारो रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परततात. स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणासाठी येथील कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोविड काळातही याच अनुभवाच्या बळावर जिल्हा रुग्णालयाने अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली आहे. अपुऱ्या मनुष्यबळातही सलग तीन वर्षांपासून ‘कायाकल्प पुरस्कार’ मिळवण्याचा चमत्कार करुन दाखवला आहे.
इन्फो
३०३ डॉक्टरांची पदे मंजूर
जिल्ह्यात असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालय, सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, नगर परिषद रुग्णालये, पोलीस ॲकॅडमी, मध्यवर्ती कारागृह, पोलीस दवाखाना अशा एकूण ३७ रुग्णालयांसाठी डॉक्टरांची ३०३ पदे मंजूर आहेत. त्यातील सुमारे एक चतुर्थांश पदे अर्थात तब्बल ७७ पदे रिक्त आहेत. त्यात वर्ग १ची अर्थात विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची ५४ पदे रिक्त आहेत तर वर्ग २च्या २३ डाॅक्टरांची पदे रिक्त आहेत.