कळवणला गत सप्ताहात ७७,४३७ क्विंटल कांद्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 11:37 PM2021-08-14T23:37:47+5:302021-08-14T23:39:00+5:30
कळवण : सध्या एकूणच महाराष्ट्रात पाऊस येण्याची अपेक्षा कायम असून, नवीन कांदा येण्याचे वेध लागलेले असताना साठविलेला कांदा चाळीत खराब होत आहे. त्यात कांदा बाजारभाव वाढत नसल्याने, कांदा उत्पादक शेतकरी दिवसाआड कांदा ट्रॅक्टर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे.
कळवण : सध्या एकूणच महाराष्ट्रात पाऊस येण्याची अपेक्षा कायम असून, नवीन कांदा येण्याचे वेध लागलेले असताना साठविलेला कांदा चाळीत खराब होत आहे. त्यात कांदा बाजारभाव वाढत नसल्याने, कांदा उत्पादक शेतकरी दिवसाआड कांदा ट्रॅक्टर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे.
चालू वर्षी कांद्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला. मात्र, आता आर्थिक गरज ओळखून शेतकरी कांदा विक्री करत आहेत.
मालाच्या प्रतवारीनुसार दर मिळत असल्याने, शेतकरी कांदा विक्रीचा निर्णय घेत आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसल्याने, काही कांदा चाळी खराब होत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी शरद देवरे यांनी सांगितले.
कांद्याची आवक जरी वाढत असली, तरी बाजारभावात थोडी-फारही भाव वाढ झालेली दिसून येत नाही. सरासरी १,५०० ते १,७०० रुपये भाव मिळाला. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्या तरी स्थिर राहणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
कळवण बाजार समितीमध्ये गत सप्ताहात कांद्याची ७७,४३८ क्विंटल आवक होती. त्यात सोमवारी १५,५९७ क्विंटल, मंगळवारी १६,५०५ क्विंटल, बुधवारी ७,१८३ क्विंटल, गुरुवारी १९,४१८ क्विंटल, शुक्रवारी १२,२३५ क्विंटल, शनिवारी ६,५०० क्विंटल आवक होती. कमीतकमी ३०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीतजास्त १,७६० ते १,९५५ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला असून, सरासरी १,५०० ते १,७०० क्विंटल भाव मिळाला.
कळवण बाजार समितीमध्ये कळवण (नाकोडा ) अभोणा व कनाशी उपआवारात चांगल्या कांद्याला चांगला दर मिळाला असला, तरी शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा आहे. कांद्याचे दर वाढले पाहिजेत, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.
कांदा बियाणे टंचाई, बियाणे दरवाढ, कमी झालेले लागवड क्षेत्र, पुढे लागवडीच्या पश्चात अवकाळी पाऊस व गारपीट अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले.
परिणामी, नैसर्गिक आपत्तीमुळे गुणवत्ता व उत्पादकतेवर परिणाम झाला . त्यामुळे तालुक्यातही उत्पादन घटले.
त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज अडचणीत आले. अशा अडचणीच्या काळात आता केंद्र सरकारचे अस्थिर निर्यात धोरण, इंधन दरवाढ, कंटेनर भाडेवाढ यासह दक्षिण भारतातील कांदा उत्पादक पट्ट्यातून होणारी आवक अशा कारणांमुळे ऑगस्ट महिन्यात आवक कमी होऊनही कांदा दर स्थिर आहेत.
कांदा लावताना बीज प्रक्रिया करण्याचे आवाहन-
कांदा म्हटलं की, योग्य नियोजन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी न केल्यास वांदे होतात. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राच्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्याची गरज समोर आलीय. नियोजनासोबत बीज प्रक्रिया महत्त्वाची असून, यातून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढविणे शक्य असल्याने, शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच रोपे टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.