७८ जोडप्यांची ‘शरियत कोर्टा’ने जुळविली मने
By admin | Published: May 10, 2016 12:03 AM2016-05-10T00:03:43+5:302016-05-10T00:30:12+5:30
राज्यातील पहिले केंद्र : संसाराची विस्कटणारी घडी समुपदेशनाद्वारे बसविण्याचा सामाजिक प्रयत्न
अझहर शेख नाशिक
किरकोळ घरगुती कारणांवरून किंवा भांडणावरून टोकाची भूमिका घेत थेट घटस्फोटाच्या निर्णयाला (तलाक) जाऊन पोहोचलेली जोडपी व त्यांच्या कुटुंबीयांचा समुपदेशनातून समझोता घडविला आहे. घटस्फोटाच्या निर्णयाप्रत पोहोचून उद्ध्वस्त होणाऱ्या एकूण ७८ जोडप्यांचा संसार नाशिकमधील मुस्लीम समाजाच्या राज्यातील एकमेव असलेल्या ‘शरियत कोर्टाने’ पुन्हा सुरक्षित करत सामाजिक बांधिलकीचा आगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
कौटुंबिक वादातून वाढणारे घटस्फोट रोखण्याच्या मुख्य उद्देशाने ३ आॅक्टोबर २०१३ रोजी अल-अशरफ फाउंडेशनद्वारे नाशिकमध्ये मुस्लीम समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू हजरत सय्यद अली अशरफ जिलानी यांच्या हस्ते शरियत कोर्टाची (दारुल-कझा) मुहूर्तमेढ रोवण्यात आली. केवळ सुखी वैवाहिक जीवनासाठी व समाजात कौटुंबिक कलहामधून येणारे वैफल्य कमी करण्याच्या उद्देशाने अशरफ फाउंडेशनद्वारे राज्यातील पहिले शरियत कोर्ट नाशिक शाखेत सुरू करण्यात आले. पुरुष व महिला धर्मगुरू आणि कायदेशीर सल्लागारामार्फत घटस्फोट घेण्याचा विचार करणाऱ्या किंवा एकमेकांपासून अलिप्त राहणाऱ्या पती-पत्नींचा व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न या केंद्राद्वारे केला जात आहे. घटस्फोटाचा निर्णय मनात पक्का केलेल्या ४५ जोडप्यांची मने जुळविण्यामध्ये केंद्राला यश आले, तर एकमेकांपासून अलिप्त राहणाऱ्या २३ पती-पत्नींना पुन्हा समझोत्याद्वारे या केंद्राने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नपुंसकतेच्या कारणावरून घटस्फोट मागणारी तीन जोडपी व पत्नीपासून वर्षानुवर्षे वेगळे होऊन दुसऱ्या शहरात नवीन विवाह करून आयुष्य जगणारे चार अशा एकूण सात जोडप्यांना इस्लामी शरियतच्या नियमांना अनुसरून पती-पत्नीच्या सहमतीने व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत ‘खुला’ (स्वतंत्र राहण्याचा मार्ग मोकळा) करून दिला. नपुंसकतेचे कारण असलेल्या तीनही जोडप्यांना वर्षभरापेक्षा अधिक कालावधीची मुदत औषधोपचारासाठी देण्यात आली होती व दोघांच्या समुपदेशनाचा अंतिम टप्प्यापर्यंत प्रयत्नही करण्यात आला; त्यानंतर त्यांच्यात ‘खुला’ करून दिल्याची माहिती येथील धर्मगुरूंनी दिली. कौटुंबिक वादातून घटस्फोट घेण्याचे प्रकरण जर न्यायप्रविष्ट झाले असेल तर अशा प्रकरणांबाबत ‘शरियत कोर्ट’ मध्यस्थी करत नाही. गुजरातमधील दोन, औरंगाबाद येथून एक, विजापूरहून दोन यांसह मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमधूनही विवाहित जोडप्यांनी येथे संपर्क साधून आपापसामधील वादविवादावर तोडगा काढत घटस्फोटाचा विचार मनातून काढून टाकत पुन्हा उत्साहाने संसार सुरू केला आहे.