सिंचन प्रकल्पांसाठी ७८ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:40 AM2017-08-23T00:40:39+5:302017-08-23T00:40:46+5:30
बागलाण तालुक्यातील प्रलंबित हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालव्याच्या कामाला लवकरच गती मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. या कामांसाठी पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचा निर्णय वित्त विभागाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रलंबित हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालव्याच्या कामाला लवकरच गती मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. या कामांसाठी पहिल्या टप्प्यात ५८ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्याचा निर्णय वित्त विभागाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर, टेंभे, बिजोरसे, चिराई, बिलपुरी, श्रीपूरवडे, करंजाड, भुयाणे, पारनेर, डांगसौंदाणे, वटार, वाठोडा, दगडी साकोडे, भावनगर येथील शेतकºयांनी प्रलंबित सिंचनप्रश्नी डॉ. भामरे यांची धुळ्यात भेट घेतली. त्याप्रसंगी उपरोक्त माहिती दिली.
तालुक्यातील विविध प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी सुमारे शंभर कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली. त्यापैकी हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा, केळझर चारी क्रमांक ८, वाघंबा, हरणटेकडी वळण योजनासाठी सुमारे ७८ कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिल्याचे भामरे यांनी सांगितले. या कामांना गती मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वित्त विभागाचे सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात अठ्ठावन्न कोटी रु पयांचा निधी वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. संबंधित विभागाकडे हा निधी प्राप्त होताच या तिन्ही प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालावधीचे बंधन ठेवण्यात
आले असून, आगामी पावसाळ्याच्या आत हे प्रकल्प पूर्णत्वास नेऊन पूरपाण्याने सदर प्रकल्पांची चाचणी घेण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी टेंभे येथील सरपंच भाऊसाहेब अहिरे, डांगसौंदाणे येथील तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय सोनवणे, पंचायत समितीचे माजी सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, डॉ. सुधीर सोनवणे, रवींद्र सोनवणे, नितीन वाघ, अनिल पाटील, विजय काकडे, केवळ देवरे, राकेश देवरे, पंडित देवरे आदींसह दीडशे ते दोनशे शेतकरी उपस्थित होते.
बंधारे दुरुस्त करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय
मोसम नदीवर पावसाचे पाणी अडविण्यासाठी आणि ही नदी बारमाही होण्याच्या दृष्टीने शासनाने ब्रिटिशकालीन बंधारे दुरुस्त करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या कामासाठी शासनाने सुमारे ७६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. हे काम निविदा स्तरावर असून, लवकरच या कामाला सुरु वात करण्यात येणार असल्याचे डॉ. भामरे यांनी यावेळी सांगितले. सटाणा येथील फड बागायतमधील पिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी हा कालवा जलवाहिन्या टाकून बंदिस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे पिकांना मुबलक पाणी मिळेल. या कामासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहितीही डॉ. भामरे यांनी दिली.