अंत्यसंस्कारासाठी करावी लागतेय आठ ते दहा तासांची प्रतीक्षाधक्कादायक : महापालिकेकडून तक्रारीची तातडीने दखल; नियमित अमरधाम खुले केल्याने समस्या सुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:13 AM2020-08-29T01:13:51+5:302020-08-29T01:14:14+5:30
नाशिक : शहरात कोरोना बळींची संख्या तसेच अन्य आजारांमुळेदेखील मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क आठ ते दहा तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यातच महापालिकेची गॅसवर चालणारी शवदाहिनी बंद पडल्याने आणखीनच गोंधळ उडाला.
नाशिक : शहरात कोरोना बळींची संख्या तसेच अन्य आजारांमुळेदेखील मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क आठ ते दहा तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यातच महापालिकेची गॅसवर चालणारी शवदाहिनी बंद पडल्याने आणखीनच गोंधळ उडाला. तथापि, प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन कोरोना बळींच्या अंत्यसंस्कारासाठी नियमित अमरधाम तातडीने खुले करून दिल्यानंतर ही समस्या काही प्रमाणात सुटली.
शहरात कोरोनाबाधितांची आणि अन्य आजाराने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा मात्र करावे लागले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मृतांवर अंत्यसंस्कार करायचे झाल्यास अमरधाममधून आठ ते दहा तासांची प्रतीक्षा करावे लागत आहे. महापालिकेच्या नाशिक आणि पंचवटी अमरधाममध्ये पारंपरीक पध्दतीने सरणाची व्यवस्था असली तरी कोरोना बळींचे अंत्यसंस्कार करताना संसर्ग टाळण्यासाठी विशेष काळजी म्हणून विद्युत दाहिनी आणि गॅस दाहिनीचा वापर केला जातो. ज्या भाागात मृत्यू झाला असेल त्याच भागात अंत्यसंस्कार करण्याचे शासनाचे नियम असल्याने जे कोरोना बाधीत नाशिकला उपचारासाठी नाशिकला येतात, त्यांच्यावर मृत्यू पश्चात नाशिकलाच अंत्यसंस्कार करण्यात येतात. नाशिकमध्ये दिवसाकाठी सुमारे ३५ जणांचा मृत्यू होत असून त्यातील २५ जण शहरातील असतात. तर उर्वरीत अन्य भागातील असतात. स्मार्ट सिटी कंपनीने उभारलेल्या विद्युत दाहीनीत २४ तासात किमान २२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तर गॅसवर चालणा-या दाहीनीवर देखील अंत्यसंस्कार करण्यात येत असले तरी तीन दिवसांपूर्वी ही डिझेल दाहीनी बिघडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना प्लॅस्टिकमध्ये लपेटून आणले जाते. ते प्लास्टीक वितळून गॅसवरील दाहीनीच्या पट्याला चिकटल्याने ही दाहीनी बंद पडली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांसाठी सर्व अमरधाम मधील सुमारे वीस सरणाचे बेड खुले करून दिले.
महापालिकेच्या गॅसदाहीनी तीन दिवसांपूर्वी बिघडली आहे. तथापि, ठेकेदार ठाण्याचा असून त्याचा तांत्रिक कर्मचारी शनिवारी (दि. २९) नाशिकला येऊन दुरुस्ती करणार आहे. त्यामुळे थोडी तांत्रीक अडचण कायम राहणार आहे. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीच्या गेल्या बैठकीत तातडीने पंचवटी अमरधाम मध्ये विद्युत दाहीनी उभारणीचे काम करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे काम केल्यानंतरच आणखी दिलासा मिळू शकेल. गेल्या महिन्यात पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्काराच्या क्रमवारीवरून मारामारीचा समर प्रसंग उदभवला होता. त्यानंतर तातडीने पंचवटी अमरधाममध्ये नवीन विद्युत दाहिनी मंजूर करण्यात आली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यसंस्काराच्या हाताळणीतून संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे विद्युत किंवा गॅस दाहिनीसारख्या सुरक्षित साधनांचा अंत्यसंस्कारासाठी वापर केला जातो. रुग्णवाहिका आणि दाहीनी वारंवार निर्जंतुक केली जाते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी काही वेळ लागतो. तथापि, नाशिक शहरासाख्या ठिकाणी जरी अंत्यसंस्कारासाठी सुरक्षीत साधने असली तरी नाशिक जिल्ह्णाच्या ग्रामीण भागात अशी सुविधा नाही. तेथे पारंपारिक सरणावरच अंत्यसंस्कार केले जातात. त्याचाच विचार करून महापालिकेने आता कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांसाठी अन्य सरणाचे (लोखंडी) बेड देखील उपलब्ध करून दिले आहेत.