रक्षाबंधनासाठी एसटी महामंडळाच्या १५० बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 02:04 AM2019-08-14T02:04:39+5:302019-08-14T02:05:13+5:30
रक्षाबंधन सणासाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाकडून १५० जादा बसेसचे निायेजन करण्यात आले आहे. बुधवार (दि.१४) पासून तीन दिवस या जादा बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा दिली जाणार आहे.
नाशिक : रक्षाबंधन सणासाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाकडून १५० जादा बसेसचे निायेजन करण्यात आले आहे. बुधवार (दि.१४) पासून तीन दिवस या जादा बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा दिली जाणार आहे. ज्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे अशा मार्गांवर प्रवासी वाहतुकीचे नियोजन केले असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, शिर्डी, कळवण, नंदुरबार आणि धुळे या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. रक्षाबंधन सणाच्या आदल्या दिवसापासून प्रवासी बसच्या माध्यमातून आपल्या गावाकडे जाण्यासाठी गर्दी करीत असते. शहरातील नवीन सीबीएस स्थानकातून तसेच नाशिकरोड बसस्थानकातून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. याबाबतची तयारी स्थानकावर करण्यात आलेली आहे. प्रवाशासाठी सूचना फलक, उद्घोषणा तसेच काही कर्मचाऱ्यांनादेखील प्रवाशांच्या सेवेसाठी स्थानकात तैनात करण्यात येणार आहे.
पुणे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होऊ शकते त्यामुळे या मार्गावरील नियमित बसेस व्यतिरिक्त काही जाता बसेस सोडल्या जातील. अहमदनगरसाठीदेखील बसेसचे नियोजन असणार आहे तर जिल्ह्यातील कळवण, वणी, पेठ या गावांकडे जाणाºया बसेसची संख्यादेखील वाढविण्यात येणार
आहे.
खासगी वाहतुकीबाबत पोलिसांत तक्रार
सणासुदीच्या काळात स्थानकाबाहेरील खासगी प्रवासी वाहतूक करणारे व्यावसायिक स्थानकामध्ये येऊन महामंडळाचे प्रवासी पळवित असल्याचा दरवेळचा अनुभव आहे. हा अनुभव लक्षात घेता महामंडळाने पोलिसांना स्थानकात पोलीस बंदोबस्त पुरविण्याबाबतचे निवेदन दिले असून, स्थानकात खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटांना बंदी घातली आहे. अशाप्रकारे कुणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे महामंडळाने कळविले आहे.