फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून ८ कोटी ६४ लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 04:20 PM2021-12-09T16:20:16+5:302021-12-09T16:21:53+5:30
मनमाड - सध्या जवळपास सर्वच रेल्वेगाड्या धावू लागल्याने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे ...
मनमाड - सध्या जवळपास सर्वच रेल्वेगाड्या धावू लागल्याने, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमधील विरोधात रेल्वे प्रशासनाने मोहीम सुरू केली. भुसावळ मंडळात नोव्हेंबर महिन्यात रेल्वे स्थानकात आणि धावत्या रेल्वे गाड्यांमधील फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ८ कोटी ६४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच चाप बसला आहे.
रेल्वेचा महसूल बुडविणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन तिकीट तपासणी मोहीम राबवत असते. मध्य रेल्वे भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासी रेल्वे गाड्यांमधील फुकट्या प्रवाशांविरुद्ध नोव्हेंबर महिन्यात तपासणी मोहीम राबविण्यात आली. मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पुणे आदी विविध भागांत येणाऱ्या गाड्यांमधून, तसेच रेल्वे स्थानकावर थांबल्या असता, उतरणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावर अचानक धाड पडल्यावर विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणून जातात. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात नोव्हेंबर महिन्यात वाणिज्य विभाग भुसावळ मंडळाला तिकीट तपासणीतून ८.६४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यात या कालावधीत १ लाख ६ हजार ४३४ अनियमित, विना तिकीट प्रवास प्रकरणे पकडली आहेत, ज्यातून ८.६४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. भुसावळ मंडळाने मागील तपासणी मोहिमेत ६.०८ कोटी मिळविले होते. मात्र, या वर्षी ८.६४ कोटी रुपये मिळवत अधिक नफा कमावला आहे.
नवीन बेंचमार्क स्थापित
तिकीट तपासणी उत्पन्नात एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केल्यामुळे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. फुकट प्रवास करणाऱ्यांना दंड करून रेल्वेचा बुडणारा महसूल जमा केला आहे, ज्यामुळे रेल्वेचा मोठा महसूल तोटा वाचला आहे.
१) भुसावळ मंडळात नोव्हेंबर महिन्यात रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमधील फुकट्या प्रवाशांविरुद्ध तिकीट तपासणीत तब्बल १ लाख ६ हजार ४३४ फुकटे प्रवाशांकडून ८.६४ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसला आहे.
२) रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट निरीक्षकाला चकवून विनातिकीट तिकीट प्रवास करणाऱ्या मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, रेल्वेच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसत आहे.
३) प्रवासाच्या दरम्यान गैरसोय टाळण्यासाठी, तसेच सन्मानाने प्रवास करण्यासाठी आणि कोविड १९ साठी अनिवार्य केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.