राेहयोचे थकीत ८ कोटी ८३ लाख रुपये खात्यात जमा!

By धनंजय रिसोडकर | Published: November 21, 2023 06:20 PM2023-11-21T18:20:55+5:302023-11-21T18:21:18+5:30

सुमारे नऊ कोटींची रक्कम दोन महिन्यांपासून थकली होती

8 crore 83 lakh rupees deposited in the account of the Rojgar Hami Yojana | राेहयोचे थकीत ८ कोटी ८३ लाख रुपये खात्यात जमा!

राेहयोचे थकीत ८ कोटी ८३ लाख रुपये खात्यात जमा!

धनंजय रिसोडकर, नाशिक: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील अकुशल मजुरांची मजुरी अखेर केंद्र सरकारने वितरित केली आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये जिल्ह्यातील मजुरांच्या बँक खात्यात आतापर्यंत थकीत ८ कोटी ८३ लाख रुपये जमा झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील रोजगार मजुरांची ही सुमारे नऊ कोटींची रक्कम दोन महिन्यांपासून थकली होती. त्यामुळे मजुरांना ऐनदिवाळीत उधार-उसनवार करून सण साजरा करण्याची वेळ आली होती. दरम्यान, केंद्र सरकारने राज्यातील मजुरांचे २९१ कोटी रुपये वितरित केल्याने जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागाने या सर्व मजुरांच्या खात्यात तातडीने सर्व रक्कम जमा केली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायद्याद्वारे मजुरांना वर्षातील किमान १०० दिवस रोजगाराची हमी दिली जाते. सध्या अकुशल मजुरांना २७३ रुपये मजुरी दिली जाते. प्रत्येक आठवड्याला मजुरांना मजुरी देण्यासाठी सरकारने ऑनलाइन पोर्टल तयार केले असून, त्यावर मजुरांच्या दैनंदिन हजेरीची नोंद केली जाते. मजुरांना मजुरी मिळण्यास उशीर झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनातून कपात करण्याचा शासनाचा नियम असल्यामुळे रोजगार हमी कामावरील मजुरांना वेळेवर मजुरी देण्यावर सर्व विभागांचा भर असतो. मात्र, मागील दोन महिन्यांपासून केंद्र सरकारने या रोजगार हमीवरील मजुरांसाठी निधीच वितरित केला नव्हता. त्यामुळे या मजुरांची मजुरी थांबली होती. रोजगार हमी कायदा लागू झाल्यापासून पहिल्यांदाच सरकारने निधी वितरित केली नसल्याने मजुरांची मजुरी थकली होती. दरम्यान, गत सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे रोजगार हमी मजुरांचे पैसे केंद्र सरकारने मजुरांच्या खात्यात वर्ग केले नसल्याने या योजनेविषयीचा विश्वास डळमळीत झाला होता. याबाबत ओरड झाल्यानंतर गत आठवड्यात निधी वितरित झाला. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने या सर्व मजुरांच्या खात्यात रक्कम जमा केल्याने दिवाळीमध्ये मजुरांना पैसे मिळू शकणार आहेत.

Web Title: 8 crore 83 lakh rupees deposited in the account of the Rojgar Hami Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक