५२ पैकी ८ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त
By admin | Published: January 25, 2017 12:22 AM2017-01-25T00:22:36+5:302017-01-25T00:23:26+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मालेगावला स्वच्छतेसाठी ‘गुड मॉर्निंग’
नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असून, बुधवारी (दि.२५) मालेगाव तालुक्यातील प्रस्तावित ४० ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ‘गुड मॉर्निंग’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी सहभागी होणार आहेत. मालेगावला २५ जानेवारीला एकाच दिवशी ४० गावांमध्ये पहाटेच्या वेळी ग्रामपंचायतींमध्ये जाऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. मालेगाव तालुक्यातील शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट जिल्ह्यात सर्वाधिक असून, अद्याप ४२ हजार ८४६ शौचालयांची बांधकामे होणे बाकी आहे. उर्वरित ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीवर उपक्रम राबवून ग्रामस्थांमध्ये शौचालय बांधकाम व वापर, महिलांसाठी शौचालयांचे महत्त्व याविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘गुड मॉर्निंग’ पथक पाठवून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने हगणदारीमुक्त अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)