म्युकरमायकोसिसचे ८ बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:04+5:302021-05-22T04:15:04+5:30
नाशिक : कोरोनाबाधितांवरील उपचारात काही मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकरमायकोसिस आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात ८ बळींची अधिकृत नोंद झाली आहे. ...
नाशिक : कोरोनाबाधितांवरील उपचारात काही मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकरमायकोसिस आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात ८ बळींची अधिकृत नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या १८९ रुग्णांची अधिकृत नोंद असून, ही संख्या यापेक्षाही खूप मोठी असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
कोरोनाबाधितांवर उपचार करताना स्टेरॉईड आणि तत्सम इंजेक्शनच्या अधिक वापरामुळे नाशिक शहरात आतापर्यंत १२७ तर जिल्ह्यात एकूण १८९ रुग्ण आढळून आले आहेत. मालेगाव आणि नाशिक शहरातच सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रुग्ण असण्याची शक्यता असली तरी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात नाक, कान, घसा तज्ज्ञ किंवा दंतरोगतज्ज्ञ नसल्याने ग्रामीण भागात फारशी प्रकरणे उघडकीस आलेली नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात बळी गेले आहेत. त्यात प्रामुख्याने कोमॉर्बिड रुग्णांचाच भरणा अधिक आहे.
इन्फो
३४ रुग्ण बरे झाल्याची नोंद
नाशिक शहरात १२७ तर जिल्ह्यात एकूण १८९ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची अधिकृतरीत्या नोंद झालेली आहे. त्यातील १२९ रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये, २४ रुग्ण अधिग्रहीत कोविड सेंटरमध्ये तर २ शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. आतापर्यंत त्यातील ३४ रुग्णांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, अधिकृत नोंदीपेक्षाही ज्यांना या आजाराचा त्रास होऊनही त्याबाबत फारशी माहितीच नाही किंवा कोरोनाच्या दुष्परिणामामुळे असा त्रास होत असेल, असाच ज्यांनी समज करून घेतला अशा रुग्णांची संख्या अधिकृत नोंदीपेक्षाही अधिक असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
इन्फो
रेमडेसिविरप्रमाणे रुग्णालयांनाच ॲम्फोटेरेसिनचे वाटप
म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी वापरले जाणारे ॲम्फोटेरेसिन ही इंजेक्शन आतापर्यंत २०० प्राप्त झाली होती. मात्र, त्यांच्या वाटपात आधी एक नियोजन, नंतर त्यात बदल, पुन्हा अचानक रांगा लावण्यास सांगून उपस्थित असतील त्यांना वाटप असे फेरबदल करण्यात आल्याने नागरिकांना तासन् तास तिष्ठत राहावे लागले होते. तसेच आठ-दहा तास थांबूनही इंजेक्शन न मिळाल्याने नागरिकांच्या संतापाचा सामना जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावा लागला. त्यामुळे आता सर्व इंजेक्शन्सचे वाटप हे रेमडेसिविरप्रमाणे हॉस्पिटल्सच्या मागणीनुसार प्रथम मेल करणाऱ्यांना प्राधान्य या तत्त्वावर आणि उपलब्ध संख्येनिहाय देण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना प्रत्येक इंजेक्शनची रक्कम आधी हॉस्पिटलला भरून मग त्या हॉस्पिटलने जिल्हा प्रशासनाकडे मेल पाठवल्यावरच ॲम्फोटेरेसिनची इंजेक्शन्स उपलब्ध होऊ शकणार आहेत.
इन्फो
स्टेरॉईड दिलेल्या मधुमेहींनाच अधिक धोका
मे महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाच्या उपचारादरम्यान ज्या रुग्णांना रेमडेसिविर, टोसिलेझुमॅब यासह काही अन्य स्टेरॉईडचा उपयोग करावा लागला होता, त्यातील काही मधुमेही रुग्णांनाच किंवा ज्यांची शुगर या स्टेरॉईड्समुळे प्रचंड प्रमाणात वाढली, त्या रुग्णांना काही दिवसांनी नाकात, कानात किंवा डोळ्यांना त्रास होऊ लागल्याचे लक्षात आले. अशा रुग्णांनाच म्युकरमायकोसिस झाल्याचे तपासणीअंती दिसून आले आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांना स्टेरॉईड देताना त्यांची शुगर वाढणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश तज्ज्ञांनी दिले आहेत.