मुक्त विद्यापीठाचे ८० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:22+5:302021-07-15T04:12:22+5:30
नाशिक : ‘हे विद्यापीठ लोकविद्यापीठ व्हावे,’ असे ध्येय निश्चित करून स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उद्देश सफल ...
नाशिक : ‘हे विद्यापीठ लोकविद्यापीठ व्हावे,’ असे ध्येय निश्चित करून स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उद्देश सफल होताना दिसत आहे. विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्याने महाराष्ट्रातील जनतेला हे आपले विद्यापीठ वाटत असल्याचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण यांचे नाव विद्यापीठाला असल्यानेच विद्यापीठाविषयी महाराष्ट्रात आपुलकीची भावना असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त लोकमत कार्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीविषयीच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले.
वंचितांपर्यंत शिक्षण पोहोचावे अशी दूरदृष्टी ठेवून शरदचंद्र पवार यांनी मुक्त विद्यापीठाची संकल्पना मांडली. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे हे विद्यापीठ असल्याने महाराष्ट्रातील जनतेची विद्यापीठाविषयी एक भावनिक आस्थादेखील आहे. तत्कालीन कुलगुरू यांनीही मुक्त शिक्षणाची संकल्पना तळागाळापर्यंत रुजविल्यामुळे विद्यापीठ लोकाभिमुख झाले झाले असल्याचा उल्लेख कुलगुरू वायुनंदन यांनी आवर्जून केला. महाराष्ट्रातील जनतेची विद्यापीठाविषयीची आस्था विद्यार्थी संख्येत दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या कठीण काळात पारंपरिक विद्यापीठांना परीक्षेला मर्यादा आलेल्या असताना मुक्त विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा यशस्वी करून दाखविल्या आहेत. याशिवाय सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असून, ही संख्या लवकरच सात लाखांपर्यंत पोहोचण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अन्य कोणत्याही पारंपरिक विद्यापीठ, तसेच शिक्षण संस्थांमध्ये नसलेली विद्यार्थी संख्या मुक्त विद्यापीठात असून, विद्यापीठाला दोनदा कॉमनवेल्थ एक्सलन्स हा आंतराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
मुक्त शिक्षणाची संकल्पना बदलत असल्याने मुक्त विद्यापीठाची देखील जबाबदारी वाढली आहे. आधुनिकतेच्या बाबतीत विद्यापीठ अगोदरही सक्षम होते आणि आता अधिक स्वयंपूर्ण झाले आहे. त्यामुळेच नव्या शैक्षणिक धोरणासाठी मुक्त विद्यापीठ सक्षम असल्याचे वायुनंदन म्हणाले. पुढील काळात विद्यापीठाचे राज्यात सर्वत्र स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर राहणार असून, इतर महाविद्यालयांवरील अवलंबिता कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
--इन्फो--
गोवा राज्यात लवकरच केंद्र सुरू होणार
मुक्त विद्यापीठाचे केंद्र आता गोवा राज्यातही सुरू होणार असून, पुढील दोन महिन्यांत गोव्यात मुक्त शिक्षण पोहोचणार आहे. कर्नाटक सीमेपर्यंत मुक्त शिक्षणाचा विस्तार झाल्याचेही ई. वायुनंदन यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सावंत, तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाच्या विस्तारासाठीची नवी दालने खुली करून दिली आहेत, असेही त्यांनी सांगितले.