केंद्राकडून पाणीयोजनेसाठी ८२ कोटी
By admin | Published: June 15, 2016 09:54 PM2016-06-15T21:54:38+5:302016-06-15T23:36:39+5:30
सिन्नर : कडवातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प; जलकुंभासह योजनेचे काम प्रगतिपथावर
शैलेश कर्पे । सिन्नर
कडवा धरणातून सिन्नर शहर व उपनगरांसाठी महत्त्वाकांक्षी पाणीयोजना राबविण्यात येत असून, या योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. या योजनेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून सिन्नरकरांना भेडसावणारी पाणीटंचाई कायमस्वरूपी निकाली निघण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सदर योजना सिन्नरकरांसाठी नवसंजीवनी देणारी ठरणार आहे.
कडवा धरणाची पाणीसाठवण क्षमता ६० दक्षलक्ष घनमीटर आहे. त्यातील ९.६६ दशलक्ष घनमीटर पाणी सिन्नरच्या पाणीयोजनेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेतून सिन्नरकरांना चोवीस तास पाणी मिळू शकेल, असा दावा नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, उपनगराध्यक्ष संजय नवसे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नगरसेवक बापू गोजरे, मल्लू पाबळे, हर्षद देशमुख, राजश्री कपोते, सुजाता गाडे, उज्ज्वला खालकर, शीतल कानडी, लता हिले, मंगला जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष पंकज जाधव यांनी कडवा धरणावर जाऊन पाणीयोजनेच्या कामाची व जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करीत कामासंबंधी सूचना केल्या.
कोनांबे शिवारात जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता १८ दशलक्ष लिटर (एलएमडी) आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून साडेसात लाख लिटर तासी पाणी शुद्धीकरण केले जाणार आहे. सध्या सिन्नर शहर व उपनगरांना ६० लाख लिटर दररोज पाण्याची गरज भासते. कडवा धरणातून राबविण्यात येणाऱ्या पाणी योजनेतून दररोज आत्ताच्या तीनपट पाणी मिळू शकणार आहे. एक्स्प्रेस फीडरद्वारे चोवीस तास वीजपुरवठा ठेवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. धरणातील साठवण विहिरीतील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात नेण्यासाठी ४५० हॉर्सपॉवरचे तीन विद्युत जलपंप आहे. यातून तासी साडेसात लाख लिटर पाणी जलशुद्धीकरण केंद्रात टाकले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कडवा धरणातून होत असलेल्या पाणीयोजनेमुळे सिन्नरकरांची टंचाई कायमस्वरूपी दूर होईल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार माणिकराव कोकाटे यांनी आघाडी शासनाच्या काळात पाठपुरावा करून केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी योजनेतून या योजनेसाठी ८२ कोटी रुपयांचा निधी मिळविला. या ८२ कोटी रुपयांच्या निधीतून सदर योजनेचे काम सुरू असून, बहुतांशी कामे पूर्ण झाली असल्याने येत्या काही दिवसात सिन्नरकरांना कडवा धरणातून पाण्याचे पाणी मिळण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)