८४ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई
By admin | Published: October 28, 2016 11:37 PM2016-10-28T23:37:53+5:302016-10-28T23:38:47+5:30
मनपाकडून नोटिसा : ७ नोव्हेंबरनंतर राबविणार मोहीम
नाशिक : न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने शहरातील ३१६ अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात रस्त्यांवर अडथळा ठरणारी ८४ धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने सदर कारवाईसाठी दि. ७ नोव्हेंबरपासून नियोजन केले आहे.
महापालिकेने शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले असता सन २००९ नंतरची ३१६ धार्मिक स्थळे आढळून आली आहेत. न्यायालयाने सदर धार्मिक स्थळे हटविण्यासाठी राज्यातील सर्व महापालिकांना आदेशित केल्याने राज्य शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानुसार, सन २००९ नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे कोणत्याही परिस्थितीत ३१ डिसेंबर २०१६ च्या आत हटवावी लागणार आहेत. महापालिकेने रस्त्यांवर अडथळे ठरणाऱ्या ८४ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी तयार केली असून, त्यांना गेल्या आठ दिवसांपासून नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. दिवाळीनंतर दि. ७ नोव्हेंबरपासून सदर अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. सदर धार्मिक स्थळांची पोलीस ठाणे निहाय यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यात अंबड पोलीस ठाणे हद्दीतील ४, सातपूर व गंगापूर- १०, पंचवटी-१८, म्हसरुळ- ३, आडगाव- ४, नाशिकरोड-देवळाली- १९, मुंबईनाका-१२, उपनगर-७, भद्रकाली-३ आणि सरकारवाडा-५ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. सदर धार्मिक स्थळे हटविण्यासाठी महापालिकेकडून पुरोहितांची नियुक्ती केली जाणार आहे. अतिक्रमण हटविण्यापूर्वी पुरोहितांमार्फत मूर्ती विधीवत बाजूला काढली जाऊन संबंधितांच्या ताब्यात दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)
धर्मगुरूंची आयुक्तांशी चर्चा
महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केल्याने या कारवाईस धार्मिक संस्थांचे विश्वस्त व धर्मगुरुंनी आक्षेप घेतला आहे. अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज, महंत भक्तिचरणदास, सोमेश्वरानंद सरस्वती यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन सदर कारवाईबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. त्याबाबत सर्व धर्मगुरुंना विश्वासात घेऊन योग्य तो बदल करण्याची सूचनाही या धर्मगुरू व विश्वस्तांनी आयुक्तांकडे केली आहे.