चिंताजनक! नाशिकमध्ये पाणीटंचाई; ८४ गावांना पावसाळ्यातही मिळते टँकरने पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 05:52 PM2022-06-29T17:52:47+5:302022-06-29T17:54:49+5:30
नाशिक : जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झालेली नसल्याने ८४ गावे आणि ८३ वाड्यांना अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली ...
नाशिक : जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झालेली नसल्याने ८४ गावे आणि ८३ वाड्यांना अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. गतवर्षी जूनच्या अखेरच्या आठवड्यात टँकर्सची संख्या ४० ने कमी झाली हेाती. यंदा मात्र ६७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पुढील चार दिवसांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यावर टँकर्सची पुढील संख्या अवलंबून असणार आहे.
यंदा सर्वत्र मान्सूनचे वेळवर आगमन होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती. परंतु जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नसल्यामुळे सुरू असलेल्या टँकर्सची संख्या अजूनही कायम आहे. दिंडोरी, निफाड आणि कळवण तालुके वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर्स हे येवला तालुक्यात १८ टँकर्स सुरू आहेत.
जिल्ह्यात एकसमान पाऊस होत नसल्याचे तसेच अवकाळी पावसामुळे नुकसानीचे प्रमाणही अधिक होत असल्याचा गेल्या दोन वर्षांचा अनुभव आहे. मान्सूनच्या या लहरीपणाचा फटका जिल्ह्याला चांगलाच बसत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागात पाण्याचे टँकर्स सुरू करण्याची वेळ येते. यंदादेखील पूर्वीसारखीच परिस्थिती असून, अजूनही टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जातच आहे.
सध्या १५ पैकी ११ तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर्स येवला तालुक्यात सुरू आहेत तर सर्वात कमी टँकर्स देवळा, नांदगाव, नाशिक, सिन्नर या तालुक्यांमध्ये आहे. १ लाख ३६ हजार नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविली जात आहे. या तालुक्यांना दिलासा देण्यासाठी आता केवळ दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
सध्या असलेली टँकर्सची स्थिती
तालुका टँकर्सची संख्या
बागलाण : ०९
चांदवड : ०६
दिंडोरी: ००
देवळा: ०२
इगतपुरी: ०४
कळवण: ००
मालेगाव: ०८
नांदगाव: ०२
नाशिक: ०१
निफाड: ००
पेठ: ०७
सुरगाणा: ०७
सिन्नर: ०१
त्र्यंबक: ०२
येवला: १८