८४० लाभार्थ्यांना जानेवारीअखेर घरकुल
By admin | Published: December 23, 2014 11:50 PM2014-12-23T23:50:32+5:302014-12-23T23:50:48+5:30
झोपडपट्टीमुक्त शहर : ८६० लाभार्थ्यांना मिळाल्या घरकुलाच्या चाव्या; प्रलंबित योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न
नाशिक : शासनाच्या बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत शहरात महापालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या ८४० घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात असून, जानेवारी २०१५ अखेर लाभार्थ्यांच्या हाती घरकुलाची चावी पडण्याची शक्यता आहे. महापालिकेने आतापर्यंत शहरातील विविध भागांतील ८६० घरकुलांचे यापूर्वीच लाभार्थ्यांकडे हस्तांतरण केले आहे.
नाशिक शहरात शासकीय जागेवर ३३, महापालिकेच्या जागांवर १६, तर खासगी जागांवर ११९ झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. त्यातील शासकीय जागेतील १३, महापालिकेच्या जागेतील ११ आणि खासगी जागांवरील ३२ झोपडपट्ट्या स्लम म्हणून घोषित झालेल्या आहेत. सन २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार शहरात एकूण १६८ झोपडपट्ट्या आहेत. शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे यासाठी शासनाच्या बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत घरकुलांची कामे सुरू आहेत. आतापर्यंत महापालिकेने ८६० घरकुलांचे लाभार्थ्यांना वाटप केले आहे, तर ८४० घरकुलांचे हस्तांतरण जानेवारी २०१५ अखेरपर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यात प्रामुख्याने संजयनगर येथील ४०, एरंडवाडी येथील ४०, चुंचाळे येथील ४८०, हॉटेल साईपॅलेसमागील शहिद भगतसिंगनगर येथील १२० आणि चेहेडी-सामनगाव रोडवरील १६० घरकुलांचा समावेश आहे. या घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात असून, बांधकाम विभागाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर सदर घरकुलांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे झोपडपट्टी विभागाचे अधिकारी यशवंत ओगले यांनी सांगितले. सदर घरकुल योजना ही शासकीय व महापालिकेच्या जागांमध्ये असलेल्या झोपडपट्टी भागातच राबविली जात आहे. महापालिकेने २१२० घरकुलांची सोडत काढलेली आहे. जानेवारीअखेर ८४० लाभार्थ्यांना घरकुले हस्तांतरीत झाल्यानंतर एकूण १७०० घरकुलांचे वाटप करण्याचे काम पूर्ण होणार आहे. उर्वरित ४२० घरकुलांच्या वाटपाबाबतची कार्यवाही बांधकाम विभागाकडून प्राप्त होणाऱ्या आदेशानंतरच राबविली जाणार आहे.