मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांना ८५ टक्के विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:17 AM2021-08-14T04:17:31+5:302021-08-14T04:17:31+5:30
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा मंगळवार (दि.१०) पासून सुरू झाल्या असून या परीक्षेला जवळपास ८५ ...
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा मंगळवार (दि.१०) पासून सुरू झाल्या असून या परीक्षेला जवळपास ८५ टक्के विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. मुक्त विद्यापीठाचे या परीक्षेसाठी सुमारे ६ लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले असून विविध विषयानुसार दिवसभरात दोन सत्रांमध्ये पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत.
मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लॉगिन स्लॉट टाइम ५ तासांचा व काही विषयांसाठी १२ तासांचा असला तरी प्रत्यक्ष परीक्षेचा वेळ ६० मिनिटे (एक तास) आहे. त्या कालावधीत परीक्षा संपवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने परीक्षेला उपलब्ध ५० प्रश्नांपैकी ३० प्रश्न ६० मिनिटांत सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला २ गुण याप्रमाणे ६० गुणांची परीक्षा होत असून ६० गुणांचे रूपांतर ८० गुणांत करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार दररोज दोन सत्रांत सकाळी ८ ते १ व दुपारी ३ ते ८ या वेळेत परीक्षा होत असून काही विषयांसाठी सकाळी ८ ते रात्री ८ अशा १२ तासांचा वेळ देण्यात आला आहे. दरम्यान, परीक्षेच्या कालावधीत परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय केंद्रावर विद्यापीठ प्रतिनिधीची नियुक्तीही करण्यात आली असून, त्यांचा मोबाइल नंबर विद्यापीठाच्या पोर्टलवर जिल्हानिहाय उपलब्ध करून देण्यात आला आहे.