८६१ टंचाईग्रस्त गावे झाली जलपरीपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:19 AM2018-02-26T01:19:18+5:302018-02-26T01:19:18+5:30
जलयुक्त शिवार योजनेमध्ये २०१६-१७ यावर्षी निवडलेल्या नाशिक विभागातील ९०० गावांपैकी ८६१ इतकी टंचाईग्रस्त गावे (९६ टक्के) जलपरीपूर्ण झाल्याने या गावांतील लोकांचे जीवनमान बदलल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिकरोड : जलयुक्त शिवार योजनेमध्ये २०१६-१७ यावर्षी निवडलेल्या नाशिक विभागातील ९०० गावांपैकी ८६१ इतकी टंचाईग्रस्त गावे (९६ टक्के) जलपरीपूर्ण झाल्याने या गावांतील लोकांचे जीवनमान बदलल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर्षीच्या आराखड्यातील नियोजित कामे शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करण्याचा मानसही झगडे यांनी यावेळी व्यक्त केला. जलयुक्त शिवार अभियान आणि नरेगा या योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीच्या संदर्भात विभागीय आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जलयुक्त शिवार अभियानामुळे टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल झाल्याचा दावा केला. गेल्या वर्षी नाशिक विभागातील ९०० गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता. त्यामध्ये प्रस्तावित २५ हजार ८०५ इतक्या कामांपैकी ९० टक्के अर्थात २३ हजार ५३५ इतकी कामे पूर्ण झाली आहेत. ८६१ गावांची पाण्याच्या टंचाईतून मुक्तता झाली आहे. पूर्ण झालेल्या कामांपैकी २१ हजार १३६ कामांचे जिओ टॅगिंगचे कामही पूर्ण झाले आहे. या कामांमुळे नाशिक विभागात १ लाख ४१ हजार ८३३ टीसीएम क्षमतेची पाणीसाठा निर्मिती झाली असून, त्याद्वारे २ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रास संरक्षित सिंचनासाठी एकदा पाणी देता येणे शक्य होणार आहे. या कामांवर ४९८ कोटी खर्च करण्यात आलेला आहे. २०१७-१८ या वर्षासाठी विभागातील ८४७ गावांची निवड जलयुक्त शिवारसाठी करण्यात आली असून, या गावांत प्रस्तावित २१ हजार ३६७ कामांसाठी ४८९ कोटी रुपयांचा आराखडा निश्चित करण्यात आल्याचे झगडे यांनी सांगितले. ३ हजार ५९५ कामांना कार्यारंभ आदेश दिलेला असून, ९७९ कामे प्रत्यक्ष सुरू आहेत. पेयजलसंबंधी बळकटीकरणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असून, त्यांची फेरतपासणी प्रांताधिकाºयामार्फत केली जाणार आहे. कमी पावसाच्या क्षेत्रात मजगीच्या कामांना प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतल्याचे झगडे यांनी सांगितले. मजगीमुळे रब्बी व उन्हाळी हंगाम असुरक्षित होणार असेल तरीही अशी कामे आता होणार नाहीत, असे महेश झगडे यांनी यावेळी सांगितले.