जिल्ह्यात प्राथमिक शाळांच्या ८८१ वर्गखोल्या पाडणार
By श्याम बागुल | Published: March 13, 2021 12:56 AM2021-03-13T00:56:43+5:302021-03-13T00:57:10+5:30
गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१ वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही खोल्या पाडण्यात आल्या असल्या तरी, काही खोल्या पाडण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी नसल्याने त्या तशाच असून, ज्या ठिकाणी खोल्या पाडण्यात आल्या, तेथील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.
नाशिक : गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१ वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही खोल्या पाडण्यात आल्या असल्या तरी, काही खोल्या पाडण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी नसल्याने त्या तशाच असून, ज्या ठिकाणी खोल्या पाडण्यात आल्या, तेथील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे सर्वप्रथम पसरविण्यात आले. त्यासाठी काही गावांमध्ये ग्रामस्थांनीच पुढाकार घेत शाळांसाठी जागा व लोकवर्गणीतून खोल्यांचे बांधकाम तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी करून दिले आहे. त्यानंतर शासनाकडूनही ज्ञानाची गंगा आणखी बळकट करण्यासाठी शाळा खोल्यांचे बांधकाम करून देण्यात आले. अशा शाळांमधून आजवर हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. मात्र, आता देखभाल व दुरूस्तीअभावी खोल्यांची परवडच होत आली आहे. शासनाकडून अन्य शैक्षणिक बाबींवर वारेमाप खर्च केला जातो. मात्र, शाळांची दुरूस्ती वा नवीन शाळांच्या बांधकामाबाबत हात अखडता घेतला जात असल्याने वर्षानुवर्षे वादळी वारा, तडाख्याच्या पावसाचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील शाळांची दुरवस्था कायम आहे. अनेक शाळांची पडझड झाल्याने अशा वर्गांमध्ये विद्यार्जन करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्याकडून धोकादायक वर्गखोल्यांची माहिती मागविली असता २९६ प्राथमिक शाळांच्या सुमारे ८८१ वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार त्या निर्लेखीत करण्यात येणार आहेत. या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, पाडण्यासाठी येणाऱ्या खर्चाची कोणतीही तजवीज शिक्षण विभागाकडून केली जात नसल्याने धोकादायक वर्गखोल्या जैसे थे आहेत. सध्या शाळा बंद असल्याने तूर्त या वर्गखोल्या पाडण्याची शिक्षण विभागाला घाई नसली तरी, पावसाळ्यात या शाळा कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.