राज्यात सहा महिन्यांत ८,९०० लोक हायवेवर पडले मृत्युमुखी; महाराष्ट्र 'टॉप-5'मध्ये
By अझहर शेख | Published: August 29, 2023 05:49 PM2023-08-29T17:49:58+5:302023-08-29T17:50:35+5:30
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरून दररोज लाखो लोक एकापेक्षा एक महागड्या वाहनांमधून प्रवास करतात
नाशिक : राज्यात घडणाऱ्या खुनांच्या घटनांपेक्षा महामार्गांवर होणाऱ्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कित्येकपटीने जास्त आहे. या सहा महिन्यांत ८ हजार १३५ फेटल अपघातात ८,९०७ लोकांनी हायवेवर प्राण सोडले. तसेच ७ हजार ३७७ अपघातात ११ हजार ९०४ प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहेत. रस्ते अपघात, त्यामधील मृत्युचे प्रमाण बघता देशात ‘टॉप-५’मध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरून दररोज लाखो लोक एकापेक्षा एक महागड्या वाहनांमधून प्रवास करतात. प्रशस्त रस्ते, उड्डाणपूलदेखील ठिकठिकाणी महामार्गांवर बांधण्यात आले आहेत. मात्र महामार्ग सुरक्षितता हा गंभीर प्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस वाढते रस्ते अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे, ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे मत राज्य महामार्ग पोलिस विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक येथील ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये मंगळवारी (दि.२९) सिंगल यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत महामार्गांवरील अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामागील कारणे याबाबत आढावा घेण्यात आला. कारणमिमांसेमध्ये राज्यातील महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट, अपघात प्रवण क्षेत्र, रस्त्यांची दुर्दशा, अपात्कालीन मदतीचा प्रतीसाद, टोलनाक्यांवरील अपात्कालीन यंत्रणा व वाहनांची अवस्था, रुग्णवाहिका, महामार्ग पोलिसांचा प्रतिसाद आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
यासोबतच महामार्गांवर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हायवे पोलिसांकडून जनप्रबोधनावर विशेष भर देण्यासाठी स्वतंत्र मोहिम राबविण्याची सूचनाही सिंगल यांनी यावेळी केली. याप्रसंगी महामार्ग पोलिस विभागाचे मुंबईचे पोलीस अधीक्षक अरविंद सालवे, पुण्याच्या लता फड, ठाण्याचे डॉ.माेहन दहीकर, रायगडचे तानाजी चिखले, नागपुरचे यशवंत सोळंके, छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.अनिता जामदार आदी अधिकारी उपस्थित हाेते.