आयटीआयला ८९३५ प्रवेश; सर्वाधिक पसंती फिटरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:20+5:302020-12-15T04:31:20+5:30
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये जिल्ह्यातील २१ शासकीय व ३० खासगी अशा एकूण ५१ ...
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये जिल्ह्यातील २१ शासकीय व ३० खासगी अशा एकूण ५१ आटीआयमध्ये प्रवेश प्रक्रीया राबविण्यात आली असून, सध्या आयटीआय प्रवेशाची तिसरी फेरी सुरू अंतिम टप्प्यात आहे. यात जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या २९ हजार २०४ जागांपैकी आतापर्यंत ८ हजार ९३५ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी आयटीआय अभ्यासक्रम प्रवेशाच्या पहिल्या फेरीत १ हजार ४०२ प्रवेश झाले होते. तर दुसऱ्या फेरीत यात दुपटीहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या जळपास ३ हजार ९४५ पर्यंत पोहोचली होती. आता तिसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, यात आतापर्यंत जवळपास पहिल्या व दुसऱ्या फेरीचे मिळून सुमारे ८ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सूत्रानी दिली आहे.
फिटर, टर्नरकडे कल
दहावी किंवा बारावीनंतर लवकरात लवकर रोजगाराची संधी मिळाली आणि त्यासाठी आपल्या हाती कौशल्य असावे यासाठी अनेक विद्यार्थी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेत असतात . यात बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा फिटर, टर्नर, मॅकेनिक, मोटर मॅकनिक, इलेक्ट्रिशियन अशा तत्काळ रोजगाची संधी मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमाकडे असतो. यावर्षी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा फिटर अभ्यासक्रमाकडे असल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत तीन फेऱ्या
नाशिक जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी आतापर्यंत तीन दोन फेऱ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतरही विविध शासकीय व खासगी संस्थांमधील जागा रिक्त राहिल्याने तिसऱ्या फेरीलाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसद मिळत आहे. प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीचा आज अखेरचा दिवस असल्याने आतापर्यंत झाल्या ८ हजार ९३५ प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, रिक्त राहाणाऱ्या जागांसाठी विशेष फेऱ्यांचे नियोजन करून प्रवेश प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पॉइंटर -
जिल्ह्यात एकूण आयटीआय- ५१
प्रवेश क्षमता - २९,२०४
आतापर्यंतचे प्रवेश -८,९३५