नाशिकमध्ये आठवीत शिकणाऱ्या मुलाचा अपहरण करून खून; पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या
By अझहर शेख | Published: November 27, 2023 05:46 PM2023-11-27T17:46:15+5:302023-11-27T17:49:42+5:30
एकूण आठ संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे, यामध्ये एका विधीसंघर्षित बालकाचाही समावेश आहे.
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढत डोक्यात राग धरून टोळक्याने राजा गब्बर सिंग (१६ रा. स्वामीनगर) या शाळकरी मुलाचे शनिवारी अपहरण केले होते. यानंतर त्याला शहराबाहेर घेऊन जात बेदम मारहाण करत ठार मारले. त्याचा मृतदेह वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजुरबहुला शिवारात फेकून पळ काढला होता. अंबड पोलिसांनी रविवारी खूनाचा प्रकार उघडकीस आणून रात्री गुन्हा दाखल केला. या खूनातील सात संशयित आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
अंबडच्या दत्तनगर भागात शुक्रवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास राजा सिंगचे संशयीतांसोबत भांडण, हाणामारी झाली होती. भांडणाचा राग मनात ठेवून संशयित आरोपी निखील दिपक पगारे (१९ ,रा. वरचे चुंचाळे), प्रविण नंदु गोवर्धने (२१,रा.अंजली पार्क, दत्तनगर), शुभम बबन कडुसकर (२३,रा. दत्तनगर), अमन संजय खरात (२४, चुंचाळे),संतोष शिवाजी वाघमारे (२३,दातीरनगर) सिध्दार्थ ज्ञानदेव दाभाडे,(२३), तसेच अशोक वामनराव साळवे (२२) यांनी संगनमताने शनिवारी (दि.२५) सायंकाळी अंबडगाव येथून राजा सिंग याचे अपहरण केले होते.
विल्होळी येथील एका खडी क्रशर जवळ त्याला घेऊन जात बेदम मारहाण केली. मारहाणीत सिंग मरण पावल्याचे लक्षात येत संशयितांनी त्याचा मृतदेह राजूर बहुला परिसरातील एका निर्जनस्थळी फेकून देत फरार झाले होते. अंबड पोलीस ठाणे व एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या पोलिसांच्या पथकांनी काही संशयित हल्लेखोरांचा शोध घेत अंबड, दत्तनगर, चुंचाळे, वरचे चुंचाळे या भागातून ताब्यात घेतले. तसेच तीघे संशयित बीड जिल्ह्यात पळून गेले होते. त्यांना तेथील माजलगावमधून पोलिसांच्या दोन्ही पथकांनी अटक केली. एकूण आठ संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे, यामध्ये एका विधीसंघर्षित बालकाचाही समावेश आहे. याप्रकरणी आणखी काही संशयित असण्याची श्यक्यता वर्तविली जात आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वसंत खतेले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.